बीएसई आणि ‘आयबीजेए’चा संयुक्त उपक्रम
केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी सूतोवाच केल्याप्रमाणे, देशातील पहिल्या वहिल्या मौल्यवान धातूच्या राष्ट्रीय विनिमय मंच (बुलियन एक्सचेंज) उभारण्यासाठी मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई आणि सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) यांच्या दरम्यान शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला.
आयबीजेए आणि बीएसई यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार, प्रस्तावित विनिमय मंचासाठी विशेष हेतू उपक्रम स्थापण्यात येईल, ज्यात आयबीजेएचा ७० टक्के तर बीएसईचा ३० टक्के वाटा असेल. या करारावर आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कम्बोज आणि बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांनी स्वाक्षऱ्या केल्या. उभयतांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे आवश्यक त्या परवान्यासाठी प्रस्ताव सादर केला असून, लवकरच त्याला मंजुरी मिळून या नव्या बाजारमंचाची पायाभरणी होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भारतात मौल्यवान धातूच्या उलाढाली करणारे सर्वच घटक अर्थात बँका, सोने व्यापारी, सराफ समुदाय यांची घाऊक खरेदी व विक्री या प्रस्तावित विनिमय मंचामार्फत होऊ लागल्यास, सरकारच्या दृष्टीने या व्यापारात अपेक्षित असलेली पारदर्शकता दिसून येऊ शकेल, असे या प्रसंगी बोलताना मोहिम कम्बोज यांनी सांगितले. संशयास्पद व र्दुव्यवहारांना पायबंद घातला जाईल यासाठी आवश्यक ती माहिती व नोंदी ठेवण्यास हा बाजारमंच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा