‘कोब्रापोस्ट’ संकेतस्थळाच्या गौप्यस्फोटामध्ये करण्यात आलेल्या दाव्याप्रमाणे आघाडीच्या तीन खासगी बँकांमध्ये काळ्या पैशाचे रूपांतर पांढऱ्यामध्ये करण्यात आले नसल्याचा निर्वाळा देतानाच, या बँकांकडून ‘केवायसी’ नियमांचे पालन न झाल्यापोटी १०.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येत असल्याचे रिझव्र्ह बँकेने सोमवारी स्पष्ट केले.
मार्च २०१३ मध्ये ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँक यांनी खातेदारांचा पैसा अन्य योजनांमध्ये वळवून या बँकांमध्ये ‘काळ्याचे पांढरे’ व्यवहार होत असल्याचे उघडकीस आणले होते. असे करताना ‘केवायसी’ नियमांचे पालन होत नसल्याचेही म्हटले गेले होते. यानंतर या बँकांनी अंतर्गत चौकशीही केली होती. तसेच रिझव्र्ह बँकेच्या तपासणीतही तसे काहीही गैर आढळले नसल्याचे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले होते. मात्र ‘केवायसी’ नियमांची पूर्तता न केल्याबद्दल अॅक्सिस बँकेला ५ कोटी रुपये, एचडीएफसी बँकेला ४.५ कोटी तर आयसीआयसीआय बँकेला १ कोटी रुपये दंड करण्यात येत असल्याचे रिझव्र्ह बँकेने सोमवारी जाहीर केले. या बँकांच्या विविध ३६ कार्यालयांमधील विविध खाती तसेच व्यवहारांची पाहणी रिझव्र्ह बँकेने केली होती.

Story img Loader