देशातील सहा महानगरांमध्ये एटीएमच्या नि:शुल्क वापरावर मर्यादा आणणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या फर्मानानुसार पाऊल टाकत, १ जानेवारीपासून पाचपेक्षा अधिक एटीएमच्या उलाढालींसाठी शुल्करचना जाहीर करण्यात खासगी क्षेत्रातील अग्रणी आयसीआयसीआय बँकेने पाऊल टाकले आहे. एटीएमच्या सशुल्क वापरासाठी कोणत्याही बँकेकडून पडलेले हे पहिलेच पाऊल असून, त्यायोगे आयसीआयसीआय बँकेच्या खातेदारांना १ जानेवारी २०१५ पासून महिन्यातील सहाव्या एटीएम उलाढालीसाठी शुल्क अदा करावे लागणार आहे.
नव्या पद्धतीनुसार बँकेच्या, मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा महानगरांमधील खातेदारांना आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर दरमहा पाच वित्तीय आणि बिगर वित्तीय उलाढाली मोफत असतील, तर अन्य बँकांच्या एटीएमवर दरमहा केवळ तीन वित्तीय व बिगरवित्तीय उलाढाली नि:शुल्क असतील. त्यापुढील वित्तीय उलाढालीसाठी खातेदारांना प्रत्येकी २० रुपये, तर बिगर वित्तीय उलाढालीसाठी ८.५० रुपये प्रत्येकी शुल्क आकारले जाईल. वरील सहा महानगरांबाहेरच्या खातेदारांसाठी अन्य बँकांच्या एटीएमवर दरमहा तीनऐवजी पाच वित्तीय व बिगर वित्तीय उलाढाली मिळून एकूण १० नि:शुल्क असतील. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक उलाढालीवर वरीलप्रमाणेच शुल्क आकारले जाईल.
रिझव्‍‌र्ह बँकेने नोव्हेंबरपासून पाचपेक्षा अधिक एटीएम उलाढालींच्या सशुल्कतेचा निर्णय घेताना, सहाव्या उलाढालींपासून शुल्क निश्चितीचे स्वातंत्र्य बँकांना बहाल केले होते. अनेक वाणिज्य बँकांनी एटीएम वापरासंबंधीचा शुल्कविषयक निर्णय घेत असल्याचे सांगितले असले, तरी त्याची सुरुवात आयसीआयसीआय बँकेकडून झाली आहे.

Story img Loader