देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या वित्तसंस्थांनी त्यांचे गृहकर्ज महाग केले आहेत. एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेने त्यांचे कर्ज व्याजदर पाव टक्क्याने वाढविले असून उभयतांमार्फत नवे दर शुक्रवारपासूनच लागू होत आहेत.
एचडीएफसीने तिचा किरकोळ प्रधान ऋण दर पाव टक्क्याने वाढवून १६.६५ टक्के केला आहे. नव्या दररचनेमुळे एचडीएफसीचा ३० लाख रुपयेपर्यंतच्या कर्जाचा व्याजदर १०.४० टक्के व त्यावरील रकमेचा व्याजदर १०.६५ टक्के झाला आहे.
आयसीआयसीआय बँकेने तिचा आधार दर पाव टक्क्याने वाढवत वार्षिक १० टक्के केला आहे. आधार दर ०.२५ टक्क्याने वाढवून तो आता ९.७५ टक्क्यांऐवजी १० टक्के केला आहे. या दरापेक्षा किमान दर आकारणी बँकेला करता येणार नाही.
आयसीआयसीआय बँकेने प्रधान ऋण दरही विस्तारित केला आहे. तोदेखील याच प्रमाणात – २३ ऑगस्टपासूनच वाढविण्यात येत आहे. यामुळे बँकेच्या बदलत्या दरांवरील कर्ज अधिक महाग होणार आहे. स्थिर दरांमध्येही कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
आयसीआयसीआय बँकेने गेल्याच आठवडय़ात विविध मुदतीच्या ठेवींवरील व्याज सुमारे पाऊण टक्क्यांपर्यंत वाढविले होते. आता कर्ज व्याजदरात वाढ करून बँकेने एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, येस बँक यांच्याबरोबर क्रम राखला आहे. तर एचडीएफसीनेही त्याला साथ दिली आहे.
आता जवळपास सर्वच खासगी बँकांचे कर्ज व्याजदर पाव टक्क्याने वाढले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आतापर्यंत केवळ आंध्रा बँकेनेच कर्ज व्याजदर वाढविले आहेत. उलट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया यांनी जूनमध्ये कर्ज स्वस्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा