सुमारे ५,००० कोटी रुपयांचा तोटा आणि तब्बल १५ ते २० टक्क्यांपर्यंत गेलेले बुडीत कर्जाचे प्रमाण यामुळे सध्या रिझव्र्ह बँकेच्या देखरेखीखाली व्यवसाय करावा लागणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने फिनिक्स झेप घेण्याची तयारी सुरू केली आहे. यानुसार येत्या दीड वर्षांत बँक आर्थिकदृष्टय़ा पूर्वपदावर येण्यासह तीन वर्षांमध्ये अव्वल बँक होण्याच्या मार्गावर आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला दिलेल्या अवाढव्य कर्जाने तोंड पोळलेल्या या बँकेने आता ताकही फुंकून पिण्यासाठी किरकोळ (रिटेल) व कृषी क्षेत्रावर अधिक भर देण्याचे निश्चित केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील वाढत्या बुडीत कर्जाचा व परिणामी फुगलेल्या तोटय़ाचा सामना करणाऱ्यांमध्ये दुर्दैवाने आयडीबीआयला गेल्या आर्थिक वर्षांत क्रमांक एकवर राहावे लागले. बँकेने मार्च २०१७ अखेर संपलेल्या वित्त वर्षांत सुमारे ५,१५८ कोटी रुपयांचा तोटा सोसला आहे. तर एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत थकीत कर्जाचे प्रमाण थेट २० टक्क्यांपर्यंत गेले आहे. यामुळे सध्या बँक रिझव्र्ह बँकेच्या देखरेखीखाली असून शाखाविस्तार आदींसाठी बँकेला मर्यादा आहेत. मात्र इतर व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
चालू आर्थिक वर्षांत बँकेला सुधारण्याची संधी देण्यात आली असून त्यासाठी आवश्यक भांडवलाचे सहकार्यही सरकारकडून केले जात आहे. मात्र झालेल्या चुका दुरुस्त करून पूर्वपदावर येण्यास बँकेला दीड वर्षांचा अवधी लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच बँकेने येत्या तीन वर्षांसाठीचे पुनव्र्यवसाय धोरण आखले आहे. यानुसार या तीन वर्षांत बँक सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रणी बँक होण्यास पात्र होऊ शकेल. त्याचबरोबर बँकेचा व्यवसाय भर आता अधिकतर किरकोळ व्यवसायावर असेल.
आयडीबीआय बँकेचा आतापर्यंत ७० टक्क्य़ांपर्यंतचा भर हा मोठे उद्योग, कंपन्या यांच्यावर होता. तर उर्वरित व्यवसाय किरकोळ, कृषी, लघू व मध्यम उद्योग आदींमार्फत सुरू होता. हे प्रमाण आता जवळपास व्यस्त होणार असल्याची माहिती बँकेचे कार्यकारी संचालक अभय बोंगिरवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. बँकेतील हा व्यवसाय बदलाचे ध्येय साध्य करण्यासाठी बोंगिरवार यांच्यावरच किरकोळ व कृषी विभागाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. यादृष्टीने बोंगिरवार यांनी पुढील तीन वर्षांचे बँकेचे या गटातील विस्तार धोरण आखले आहे.
किरकोळ व्यवसायात बँक थेट विस्तार करण्यापेक्षा अप्रत्यक्षरीत्या अधिक कार्य करेल, असे बोंगिरवार यांनी सांगितले. बोंगिरवार म्हणाले की, थेट गृह कर्जदार वाढविण्यापेक्षा मोठे गृह प्रकल्प, व्यापारी संकुल यांच्या माध्यमातून कर्ज व्यवसायाचा विस्तार केला जाईल. तसेच कृषी क्षेत्रात शेतकी, शेतीवर व संबंधित व्यवसाय तसेच लघू व मध्यम उद्योगांमध्ये नावीन्यावर भर देणारे व्यवसाय यांना वित्तपुरवठा करण्यावर बँकेचा अधिक भर असेल. सार्वजनिक बँक म्हणून आमचे सध्या अनेक मोठे सरकारी विभाग, कंपन्या ग्राहक आहेत. हे जाळे अधिक विस्तारले जाईल, असेही ते म्हणाले.
बँकेच्या सद्य:स्थितीबाबत बोंगिरवार यांनी सांगितले की, बँक आता मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार असून इतर व्यवसायातून काढता पाय घेणार आहे. यामुळे बँकेचा तोटा कमी होईल. तसेच थकीत कर्जाची वसुलीही प्रगतीपथावर आहे. बँकेच्या चालू व बचत खात्यांची संख्या वाढण्याचे प्रमाण येत्या २०२० पर्यंत वार्षकि २० टक्के होईल. किरकोळ कर्ज वितरण, किरकोळ मुदत ठेवी यांचेही प्रमाण या दरम्यान वार्षिक दुहेरी अंकामध्ये वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
बँकेने आखलेल्या नजीकच्या ध्येयधोरणामुळे २०२० पर्यंत बँकेचे सार्वजनिक क्षेत्रातील स्थान भक्कम तसेच अव्वल असेल, असा विश्वासही बोंगिरवार यांनी ‘लोकसत्ता’जवळ व्यक्त केला.