महाराष्ट्र परिमंडळात पहिली खासगी दूरसंचार सेवा सुरू करणाऱ्या आयडिया सेल्युलरने दोन कोटी मोबाइलधारकांचा टप्पा गाठला आहे. चालू वर्षांतील नव्या ३६ लाख मोबाइलधारकांमुळे दोन कोटी ग्राहक मिळविणारी ती पहिली खासगी दूरसंचार कंपनी ठरली आहे.
आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलरने १९ वर्षांपूर्वी महाराष्ट्र परिमंडळात दूरसंचार सेवा सुरू केली होती. या भागात मोबाइल सुविधा देणारी आयडिया सेल्युलर ही पहिली कंपनी आहे. दूरसंचार क्षेत्र म्हणून महाराष्ट्राबरोबर गोवा राज्याचाही याच परिमंडळात समावेश होतो. मुंबई परिमंडळ स्वतंत्र आहे. या परिमंडळात सध्या रिलायन्स, युनिनॉर, एअरसेल, भारती एअरटेल, व्होडाफोन आदी कंपन्याही तूर्त कार्यरत आहेत.
आयडिया सेल्युलरच्या ग्राहक संख्येत चालू वर्षांत आतापर्यंत ३६ लाखांची भर पडली आहे. यामुळे कंपनीने एकूण दोन कोटी मोबाइलधारक जमविले आहेत. कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या अन्य परिमंडळांच्या तुलनेत सर्वाधिक ग्राहक याच भागातून मिळाले आहेत. त्याचबरोबर या परिमंडळात सर्वाधिक ग्राहक संख्येनेही अन्य खासगी स्पर्धकांच्या तुलनेत पुढे आहे. दूरसंचार क्षेत्रासाठी एकच असलेल्या महाराष्ट्र व गोवा या परिमंडळात सर्वाधिक महसुली बाजार हिस्सा मिळविणारीदेखील आयडिया सेल्युलर ही एकमेव कंपनी ठरली आहे.
जून ते सप्टेंबर २०१५ या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने दोन टक्के वाढ नोंदवीत ३१.४ टक्के महसुली बाजार हिस्सा राखला आहे. आयडिया सेल्युलरची या परिमंडळात टुजी तसेच थ्रीजी दूरसंचार सेवा आहे. परिमंडळातील ६,२०० शहर व गावांमध्ये १५ हजारांहून अधिक संपर्क यंत्रणा असलेल्या या कंपनीचे ८६० सेवा केंद्रे आहेत. कंपनी लवकरच ४जी सेवाही या भागात सुरू करणार आहे. जीएसएम, थ्रीजी व ४जी दूरसंचार सेवा देणारी आयडिया सेल्युलर ही या परिमंडळातील एकमेव कंपनी ठरणार आहे.

Story img Loader