दूरसंचार ध्वनिलहरींच्या आपआपसातील खरेदी-विक्रीतील पहिला व्यवहार व्हिडीओकॉन कम्युनिकेशन्स व आयडिया सेल्युलरमध्ये झाला आहे. यानुसार व्हिडीओकॉनच्या गुजरात व उत्तर प्रदेश (पश्चिम)मधील ध्वनिलहरी आयडिया सेल्युलरने खरेदी केल्या आहेत.
आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलरने ३,३१० कोटी रुपये मोजून दोन परिमंडळातील या ध्वनिलहरी घेतल्या आहेत. याद्वारे कंपनी परिमंडळात पुढील वर्षी ४जी तंत्रज्ञानावरील दूरध्वनी सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.
दूरसंचार कंपन्यांकडे असलेल्या ध्वनिलहरींच्या खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेसाठी गेल्याच महिन्यात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. याद्वारे कंपन्या त्यांच्याकडील ध्वनिलहरी इतर कंपन्यांना विकू शकतात.
नोव्हेंबर २०१२ मध्ये झालेल्या ध्वनिलहरी लिलावात व्हिडीओकॉन कम्युनिकेशन्सने सहा परिमंडळातील ध्वनिलहरी परवान्यांकरिता २,२२१.४४ कोटी रुपये खर्ची केले. पैकी गुजरात व उत्तर प्रदेश (पश्चिम)करिता १,३२९ कोटी रुपये गुंतविण्यात आले. कंपनी उत्तर प्रदेश (पूर्व) व बिहारमधील ध्वनिलहरी विकून ३,५०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत असल्याचेही समजते.
आयडिया सेल्युलरने १२ सेवा विभागात ४जी तंत्रज्ञान विकसित करण्याचे निश्चित केले आहे. जानेवारी ते जून २०१६ दरम्यान कंपनी तिच्या १० परिमंडळातील ७५० शहरांमध्ये ४जी सेवा सुरू करेल.

Story img Loader