सरकारने प्रस्तावित केलेल्या आगामी २जी ध्वनिलहरींच्या लिलावात आयडिया सेल्युलरचे ९०० मेगाहर्ट्झ आणि १८०० मेगाहर्ट्झ दोन्ही लहरींच्या पट्टय़ात स्वारस्य असून, मुदत संपुष्टात येणाऱ्या नऊ परिमंडळांतील परवान्यांच्या नूतनीकरणासाठी बोली लावण्याचा मानस कंपनीने स्पष्ट केला आहे.
देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोबाइल सेवा प्रदाता असलेल्या आयडियाने कार्यक्षेत्रातील व्याप्तीच्या जोरावर सरलेल्या जून-सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात ६९ टक्के वाढ नोंदविणारी कामगिरी केली. कंपनीच्या आर्थिक कामगिरीची माहिती देताना, व्यवस्थापकीय संचालक हिमांशू कपानिया यांनी नव्या लिलाव प्रक्रियेत सहभाग मानस स्पष्ट केला. आयडिया ज्या ध्वनिलहरींसाठी बोली लावण्यास उत्सुक आहे, त्यांची आधार किंमत १०,००० कोटी रुपयांपासून सुरू होते, अशी पुस्तीही कपानिया यांनी जोडली. तरी आदित्य बिर्ला समूहातील या कंपनीला लिलाव प्रक्रियेसाठी अतिरिक्त भांडवल उभारण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट कंपनीवरील कर्जदायित्व उत्तरोत्तर कमी करून ताळेबंदावरील नक्त कर्जबोझा हलका करण्याकडे कल असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा