पायाभूत सेवा क्षेत्रासाठी वित्त पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या आयडीएफसी लिमिटेडला बँक व्यवसाय सुरू करण्यासाठीचा अंतिम परवाना अखेर प्राप्त झाला आहे. रिझव्र्ह बँकेने याबाबत हिरवा कंदील दाखविल्यानंतर बँकेचे प्रत्यक्ष कामगार १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. बँक २० शाखांच्या माध्यमातून या व्यवसायाला प्रारंभ करेल.
तिसऱ्या फळीतील नव्या बँकिंग परवान्यासाठी आयडीएफसी लिमिटेड व बंधन फायनान्शिअल या दोनच वित्तसंस्था पात्र ठरल्या होत्या. पैकी बंधनने २३ ऑगस्टपासून व्यवसायास प्रारंभ करण्याचे जाहीरही केले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते बँकेच्या कोलकता येथील मुख्यालयी तिचा शुभारंभ होईल. बँकेच्या बोधचिन्हासह संचालक मंडळही पंधरवडय़ापूर्वीच जारी करण्यात आले.
बँकिंग नियामक कायदा, १९४९ च्या कलम २२ (१) अंतर्गत रिझव्र्ह बँकेकडून आयडीएफसी बँक लिमिटेडला गुरुवारी बँक परवाना मान्य झाल्याची माहिती आयडीएफसीने मुंबई शेअर बाजाराला कळविली आहे. स्पर्धेत आयडीएफसी, बंधनसह २५ कंपन्या, उद्योगांनी परवान्यासाठी एप्रिल २०१४ मध्ये अर्ज केला होता. मात्र अवघ्या दोघांनाच मान्यता देण्यात आली. पैकी बंधनला गेल्याच महिन्यात अंतिम परवाना प्राप्त झाला.
आयडीएफसी लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ३० जुलै रोजी होत आहे. यामध्ये बँकेच्या आगामी प्रवासाबाबतचे चित्र कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राजीव लाल हे अधिक स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
प्राथमिक ५५,००० कोटी रुपयांच्या कर्ज तरतुदीनुसार, आयडीएफसी बँक व्यवसायास १ ऑक्टोबरपासून प्रारंभ करेल. बँकेच्या प्रमुख पहिल्या टप्प्यात २० शहरांमध्ये शाखा असतील. बँकेसाठी आतापर्यंत ६०० मनुष्यबळ जोडण्यात आल्याचे कळते.
देशभरातील प्रमुख शहरांमध्ये २२ शाखांपासून बँकेच्या व्यवसायाची सुरुवात होण्याचीची चर्चा आहे. त्यात, मुंबई, दिल्ली, बंगळुरु, कोलकता, अहमदाबाद आदी शहरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मध्य भारतात शाखांचे जाळे अधिक असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा