चालू आर्थिक वर्षांच्या दोन तिमाहीच्या उंबरठय़ावरील अर्थव्यवस्थेचा प्रवास काहीसा सुधारला आहे, हे नमूद करणारी प्रमुख आकडेवारी बुधवारी उशिरा प्रसारित झाली. सामान्यांसाठी कमी होत असलेली महागाई आणि उद्योगांसाठी वाढत्या उत्पादनाच्या बाबतीत गेल्या दोन महिन्यांत सुधार दिसून आला आहे. प्रामुख्याने भाज्या, फळांच्या किमती कमी झाल्याने जुलै २०१५ मधील किरकोळ महागाई दर ३.७८ टक्क्यांवर विसावला आहे. तर जून २०१५ मध्ये औद्योगिक उत्पादन दर ३.८ टक्क्यांवर वाढत गेल्या चार महिन्यांतील सर्वोत्तम राहिला आहे.
जुलैमधील महागाई दर ३.७८ टक्क्यांवर
दुसऱ्या तिमाहीच्या पहिल्याच महिन्यात, जुलै २०१५ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ३.७८ टक्क्यांवर विसावला असून तो आधीच्या महिन्यातील ५.४० टक्क्यांच्या तुलनेत कितीतरी नरमला आहे. भाज्या, फळे आदी प्रामुख्याने खाद्यान्नाच्या किमती कमी झाल्याने गेल्या महिन्यातील एकूण महागाई दर हा कमी झाला आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित यापूर्वीचा वाढता महागाई दर ७.३९ टक्क्यांपर्यंत गेला होता. याच निर्देशांकावर आधारित अन्नधान्य महागाईचा दर जुलै २०१५ मध्ये २.१५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आधीच्या, जूनमध्ये तो ५.४८ टक्के होता.
वार्षिक तुलनेत भाज्यांचे दर जुलैमध्ये उणे स्थितीत (-७.९३%) आले आहेत. फळेही १.४५ टक्क्यांनी स्वस्त झाली आहेत. जीवनसत्त्व असणारे खाद्य पदार्थ, डाळी, मटण, मासे, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल आदींच्या किमती मात्र गेल्या महिन्यात वाढल्या आहेत.

जूनमधील औद्योगिक उत्पादन चार महिन्यांच्या उच्चांकावर
निर्मिती क्षेत्राची कामगिरी जून २०१५ मध्ये उंचावत गेल्या चार महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. या कालावधीत औद्योगिक उत्पादन दर ३.८ टक्क्यांनी वाढला आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर आधारित औद्योगिक उत्पादन वर्षभरापूर्वी, जून २०१४ मध्ये ४.३ टक्क्यांनी वाढले होते. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यांत उत्पादन संमिश्र राहिले आहे. मेमध्ये ते २.५ टक्के तर मार्चमध्ये हा दर ३.३५ टक्के होता. यापूर्वी फेब्रुवारी २०१५ मध्ये दर सर्वोच्च ४.९ टक्के होता. एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत औद्योगिक उत्पादन ३.२ टक्के नोंदले गेले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो ४.५ टक्के होता. निर्देशांकात सर्वाधिक ७५ टक्क्यांपर्यंत हिस्सा असलेल्या निर्मिती क्षेत्राची वाटचाल ४.६ टक्के राहिली आहे.
आता व्याजदर कमी व्हावेत: अरुण जेटली
नवी दिल्ली: भारताच्या आर्थिक स्थितीत आमूलाग्र सुधार दिसत असून येत्या काही वर्षांमध्ये व्याजदर कमी होताना दिसतील, असा दिलासा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तमाम कर्जदारांना दिला.
अर्थमंत्र्यांनी मध्यम कालावधीच्या खर्चाचा आराखडा असलेले परिपत्रक संसदेत सादर केले. त्या वेळी त्यांनी हे भाष्य केले. वित्तीय तूट कमी करण्यासह अनुदान सुधारणा राबविण्याचे सरकारचे धोरण कायम असेल, असेही ते या वेळी म्हणाले.
चालू आर्थिक वर्षांच्या चौथे द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दर स्थिर ठेवले होते. या पाश्र्वभूमीवर कमी व्याजदराबाबत जेटली यांनी आशावाद उंचावला आहे.
२०१४-१५ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन ७.३ टक्के झाले असून आधीच्या आर्थिक वर्षांतील ६.९ टक्क्यांच्या तुलनेत ते अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच चालू आर्थिक वर्षांत विकास दर ८ ते ८.५ टक्के राहील, असा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर सरासरी उणे २.४ टक्के राहिला असल्याचे नमूद करत जेटली यांनी वित्तीय तूट कमी करण्यात सरकारला आलेल्या यशामुळे महागाईवरील दबाव आपसूकच कमी झाला आहे, असे म्हटले आहे.
मान्सून चांगला झाला तर पतधोरणापूर्वी व्याजदर कपात करता येईल, असा मार्ग डॉ. राजन यांनी चालू महिन्याच्या सुरुवातीला सादर केलेल्या पतधोरणादरम्यान सांगितला होता. मध्यवर्ती बँकेने जानेवारी २०१५ पासून केलेल्या ०.७५ टक्के दर कपातीचा लाभ बँकांनी प्रत्यक्षात ग्राहकांपर्यंत केवळ ०.३० टक्क्यांपर्यंत पोहोचविला, असेही गव्हर्नर म्हणाले होते.

Story img Loader