तुम्हीही जर ट्रेडिंग करत असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. डिमॅट खातेधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा ते त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये लॉगिन करण्यास असमर्थ ठरतील. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने यासंबंधीचे एक परिपत्रक जून महिन्यात जारी केले होते. यानुसार खातेधारकांना आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये लॉगिन करण्यासाठी पहिले ऑथेंटिकेशन फॅक्टर म्हणून बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचा वापर करावा लागेल. तर दुसरे ऑथेंटिकेशन नॉलेज फॅक्टर असेल.
बायोमेट्रिक प्रमाणीकरणामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनिंग, फेशियल रेकग्निशन किंवा व्हॉइस रेकग्निशन यांचा उपयोग केला जातो. तर नॉलेज फॅक्टरमध्ये पासवर्ड, पिन यासारख्या केवळ वापरकर्त्यालाच माहित असेल अशा माहितीचा समावेश असेल. वापरकर्त्यांना एसएमएस आणि ई-मेल या दोन्हींद्वारे ओटीपी प्राप्त करावा लागेल. जर कोणत्याही कारणास्तव बायोमेट्रिक प्रमाणीकरण शक्य नसेल तर वापरकर्त्यांना नॉलेज फॅक्टरचा पर्याय वापरावा लागेल. यामध्ये पासवर्ड/पिन, पझेशन फॅक्टर आणि यूजर आयडी असू शकतो. याचा वापर टू-फेस प्रमाणीकरण म्हणून करावा. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक स्टॉक ब्रोकर्स दुसरा प्रमाणीकरण घटक वापरत आहेत. यामध्ये पासवर्डचा समावेश नाही.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने या संदर्भात सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या २०१८ च्या परिपत्रकाचा हवाला दिला आहे. सायबर सुरक्षेशी संबंधित या परिपत्रकात, प्रमाणीकरण घटकांबद्दल फरक सांगण्यात आला आहे. म्हणून, एनएसईने ३० सप्टेंबरपासून लॉग इन करण्यासाठी द्वि-घटक (टू-फॅक्टर) प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे.
दरम्यान, सर्व स्टॉक ब्रोकर्सनी त्यांच्या ग्राहकांना याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली आहे. झिरोधाने आपल्या वेबसाइटवर सांगितले आहे की एक्सचेंजच्या नवीन नियमांनुसार, ३० सप्टेंबरपूर्वी डीमॅट खात्यात लॉग इन करण्यासाठी ओटीपी द्वि-घटक प्रमाणीकरण आवश्यक आहे. अन्यथा, वापरकर्ते ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरण्यास सक्षम नसतील.