इम्पॅक्ट गुरूचे ग्लोबलगिव्हिंगबरोबर भागीदारीतून डिजिटल व्यासपीठ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उपक्रमांना आर्थिक मदत देऊन अमेरिका-ब्रिटनस्थित मूळ भारतीय व अनिवासी भारतीयांना इम्पॅक्ट गुरूमार्फत करसवलतीचे लाभ मिळविणे आता शक्य होणार आहे. जनसामुदायिक निधी उभारणारा (क्राऊडफंडिंग) भारतातील सर्वात मोठा मंच असणाऱ्या इम्पॅक्ट गुरूने यासाठी डिजिटल व्यासपीठाच्या निर्मितीची वाट सुकर करणारी भागीदारी अमेरिका व ब्रिटनमध्ये कार्यरत ग्लोबलगिव्हिंगशी केली आहे. या भागीदारीमुळे ग्लोबलगिव्हिंगच्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील एनजीओ आणि सामाजिक उद्यमांची www.impactguru.com वरून पडताळणी करता येईल आणि आंतरराष्ट्रीय देणगीदारांना विशेषत: अनिवासी भारतीय आणि भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींना देणगी देऊन करलाभही मिळविता येतील.

जगातील सर्वाधिक ना-नफा तत्त्वावरील संस्थांचे (तब्बल ३३ लाख एनजीओ) भारत हे माहेरघर आहे आणि या संस्था आंतरराष्ट्रीय देणगीदारांमार्फत दरसाल ८,५०० कोटी रुपये उभारत असल्याचा अधिकृत अंदाज आहे.

विदेशस्थ दात्यांच्या सेवाभाव वृत्तीला स्थानिक स्तरावर उपलब्ध करविषयक लाभाने मोठी चालना मिळेल, असे इम्पॅक्ट गुरूचे सह-संस्थापक पीयूष जैन यांनी विश्वास व्यक्त केला. यातून मुख्यत: विदेशातील भारतीय समुदायाच्या दातृत्वाला प्रोत्साहित केले जाईल असे त्यांना वाटते.

यापूर्वी इम्पॅक्ट गुरूने फंडनेल या सिंगापूरस्थित खासगी गुंतवणूक मंचाबरोबरीने भागीदारीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यातून तिला दक्षिणपूर्व आशियात अस्तित्व निर्माण करता आले आहे. २०१६ सालापासून इम्पॅक्ट गुरू आणि फंडनेल यांनी वेगवेगळ्या १५ देशांमधील उपक्रमांसाठी ३२९ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात संस्थांना साहाय्य केले आहे.

 

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impact guru crowdfunding india ngo in india