जागतिक बाजारात सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या किंमती अस्थिरता पाहता, केंद्र सरकारने त्यावरील आयात शुल्क कमी केले आहेत. सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. यानुसार प्रति १० ग्रॅम सोन्यावरील आयात शुल्क ५३९ डॉलर आणि एक किलोवरील चांदीचे आयात शुल्क ९७९ डॉलपर्यंत खाली आणण्यात आले आहे.
हौस आणि गुंतवणूक म्हणून भारतीयांकडून वाढलेल्या सोने हव्यास सरकारसाठी खर्चिक भार ठरत असताना केंद्र सरकारने गेल्या वर्षांत दोन वेळा मौल्यवान धातूवरील आयात शुल्क वाढविले होते. यामुळे देशात सोने आयातीचे प्रमाण कमी होऊन वाढत्या आयात-निर्यात व्यापार तुटीवर नियंत्रण राखता येईल, असा सरकारचा होरा होता. तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २०१२-१३ च्या अर्थसंकल्पातही आयात शुल्कात वाढीचा कठोर निर्णय घेतल्यानंतर देशभरातील सराफांनी बंद पुकारून त्याविरोधात रोष व्यक्त केला होता. सराफांच्या महिन्याभराच्या आंदोलनानंतर तो काही प्रमाणात शिथीलही करण्यात आला.
सीमाशुल्कावर आधारित किमान आयात शुल्क दर पंधरवडय़ाला जाहीर करण्यात येते. डिसेंबरमध्ये हे शुल्क सोन्यासाठी (प्रति १० ग्रॅम) ५५० डॉलर तर चांदीकरिता (प्रति किलो) १,०६२ डॉलर होते. जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती अस्थिर असल्याने आयात शुल्क कमी करण्यात येत असल्याचे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमाशुल्क मंडळाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले. अमेरिकेच्या बाजारात सोन्याचे दर प्रति औन्स (२८.३५ गॅॅ्रम) १,६७५.२० डॉलरवर गेले आहेत. अमेरिकेतील ‘फिस्कल क्लिफ’च्या धर्तीवर तेथे मौल्यवान धातूंचे दर महिन्याभरात ६ टक्क्यांनी वधारले आहेत.
सोने-चांदीवरील आयात शुल्क घटले
जागतिक बाजारात सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या किंमती अस्थिरता पाहता, केंद्र सरकारने त्यावरील आयात शुल्क कमी केले आहेत. सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला.
First published on: 02-01-2013 at 03:41 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Import tax gets reduce on gold silver