आधीच भरलेल्या तयार नमुन्यांची पुढील वर्षी सुविधा
संगणकाद्वारे ऑनलाइन प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आणखी लोकप्रिय बनविण्याच्या उद्देशाने, आता करदात्यांना त्यांनी आधी दाखल केलेल्या विवरणपत्राच्या आधारे अगोदरच भरलेले तयार नमुना अर्ज उपलब्ध करण्याच्या सुविधेवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ विचार करीत आहे. पुढील आर्थिक वर्षांपासून ही सुविधा सुरू केली जाऊ शकेल.
चालू वर्षी ऑगस्टमध्ये विवरणपत्राचा नवीन अर्ज सुरू करण्यात आला. ज्या अंतर्गत करदात्याला त्याचा आधार क्रमांक, इंटरनेट बँकिंग सेवा आयडी अथवा एटीएम पिनच्या सहाय्याने वैधतेचा संकेतांक ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे वार्षिक पाच लाखांपेक्षा कमी करपात्र उत्पन्न असलेल्या आणि कर परताव्याचा दावा न करणाऱ्या करदात्यांना प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग संकेतस्थळावर जाऊन हा वैधता संकेतांक मिळविण्यासाठी नोंदणी करता येईल. जो करदात्यांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर धाडला जाईल.
या संकेतांकातून करदात्यांना त्यांनी विवरणपत्रात आदल्या वर्षी भरलेल्या माहितीचा पूर्ण अर्ज नव्याने विवरणपत्र भरताना मिळू शकेल. या अर्जातील आकडे केवळ सुधारून त्यांना जलदपणे व अतिशय सुलभरीत्या विवरणपत्र भरता येईल, असा कर विभागाचा प्रयत्न आहे.
चालू वर्षांत इंटरनेटच्या सहाय्याने विवरणपत्र भरण्याच्या ७ सप्टेंबर या विस्तारित अंतिम दिनांकापर्यंत २.०६ कोटी विवरणपत्रे दाखल करण्यात आली. मागील वर्षांतील १.६३ कोटींच्या तुलनेत यंदा त्यात २६.१२ टक्क्यांनी प्रगती झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा