गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या इंधर दरवाढीमुळे मुंबईसारख्या शहरात सीएनजीच्या मागणीत वाढ होत असून अशा इंधनांवर चालणाऱ्या वाहनांनाही विक्री वाढत आहे. सीएनजी हा इंधन प्रकार पेट्रोलच्या तुलनेत ६८ टक्के तर डिझेलच्या तुलनेत ३५ टक्के कमी खर्चाचा असल्याचा दावा केला जातो. पर्यावरणदृष्टय़ाही सीएनजीवरील वाहने फायदेशीर ठरतात, असे मानले जाते.
मुंबईसारख्या शहरात सध्या २.७ लाख वाहने ही सीएनजीवर धावतात. यामध्ये ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतील वाहनांचाही समावेश आहे. त्यात सर्वाधिक १.४५ लाख ऑटोरिक्षा तर ५२ हजार टॅक्सी आहेत. सार्वजनिक वाहतूक म्हणून ३,३०० बस तर खाजगी बससह ४,५०० व्यापारी वाहने आहेत. सीएनजीवर धावणाऱ्या एकूण खाजगी वाहनांची संख्या ही ६८,००० च्या पुढे आहे. मार्च २००८ मध्ये शहरात सीएनजीवर चालणाऱ्या बस, व्यापारी वाहने, मिनी बस यांची संख्या २,९६९ होती. ती २०१२ अखेर ४,५९१ पर्यंत गेली. तर पाच वर्षांपूर्वी ४,७६३ असणारी खाजगी प्रवासी कारची संख्या आता ६४,५४८ वर गेली आहे. सीएनजीची मागणी वाढली असताना या इंधन भरणा केंद्राची उपलब्धतता मात्र अपुरी आहे. शहरात ‘महानगर गॅस लिमिटेड’च्या माध्यमातून १५५ ठिकाणी सीएनजीचा पुरवठा होतो.

Story img Loader