आशियातील बहुतेक शेअर निर्देशांक खाली असूनसुद्धा भारतातील दोन्ही प्रमुख शेअर निर्देशांकांनी मंगळवारी दमदार सलामी दिली. निकाल हंगामातील दुसरा महत्त्वाच्या कंपनीचा अर्थात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निकालांबाबत सकारात्मकतेने दोन्ही निर्देशांकांनी कालच्या तुलनेत दोन टक्क्यांहून अधिक कमाई करीत दिवसअखेर विश्राम घेतला.
अमेरिकेच्या नायमेक्स बाजारावर कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरूच राहिल्याने भारतातील तेल विपणन कंपन्या त्याचप्रमाणे व्याज दरकपातीच्या अपेक्षेने प्रमुख बँकांनी सोमवारच्या मध्य सत्रापासून सुरू केलेली आगेकूच आजही सुरूच ठेवल्याचे आढळून आले. सेन्सेक्सने आज १८३५६.३२ वर सुरुवात केली आणि कालच्या तुलनेत ३७३.३१ अंशांची कमाई करीत त्याने १८७३१.११ वर तो बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ११६.५५ची कमाई करीत ५,६८५.९५ वर बंद झाला.
सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये सर्वात प्रभावशाली असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने निकाल जरी बाजाराचे कामकाज संपल्यावर संध्याकाळी उशिरा येणार असले तरी ते चांगले असतील या अपेक्षेने बाजारात या समभागाला चांगली मागणी राहिली. रिलायन्सचा वार्षिक महसूल १० ते १४ टक्के तर निव्वळ नफा २५-३० टक्के वाढेल असा विश्लेषकांचा पूर्वअंदाज बाजारातील उत्साहाच्या पथ्यावर पडला. आज देशी-विदेशी अर्थसंस्थांकडून रिलायन्सची दमदार खरेदी केली. परिणामी, मुंबई शेअर बाजारात रिलायन्सचा भाव १.३८ टक्क्यांनी वाढून ८०४.५० वर बंद झाला आणि रिलायन्समधील वाढीने एकूण निर्देशांक वाढीसही मोठे योगदान दिले.
तथापि अमेरिकेतील बोस्टन शहरातील दहशतवादी बॉम्बस्फोटाच्या घटनेचा फटका माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना बसला. अमेरिकी काँग्रेसमध्ये मांडल्या जाणाऱ्या ‘स्थलांतर विधेयका’च्या तरतुदीचा फटका माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसाय विस्तारावर मर्यादा घालणारा असण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या बाबतीत सावध पवित्रा घेतलेला आज बाजारात दिसून आले.
केंद्रीय वीज नियामक प्राधिकरण (सीईआरसी)ने दरवाढीस मुभा दिल्याच्या बातमीने टाटा पॉवरचा भाव वधारला.
सोन्याचे भाव गडगडल्याच्या फटका हा सोने-तारण कर्ज देणाऱ्या मन्नपूरम गोल्ड आणि मुथ्थूट फायनान्स यांसारख्या कंपन्यांना बसताना दिसला. सोन्याने घेतलेल्या आपटीप्रमाणेच मुथ्थूटच्या समभागाचे भाव तब्बल ९.४४ टक्क्यांनी तर मन्नपूरमचा भाव ९.७७ टक्क्यांनी गडगडताना दिसले.
‘इन्फोसिस’बद्दलचा सूर बदलला!
गेल्या शुक्रवारी निकाल जाहीर करताना इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षांत डॉलरमधील महसूल फक्त ६ ते १० टक्क्यांदरम्यान वाढेल असा संकेत देताच, या समभागाचा भाव तब्बल २२ टक्क्यांनी कोसळला. आठवडापूर्वीच्या रु. २,९४३ या भावावरून इन्फोसिसचा मंगळवारचा बंद भाव रु. २२९४ पर्यंत रोडावला आहे. मंगळवारीही अमेरिकेतील नकारात्मक घटनाक्रमापायी एकूणच माहिती-तंत्रज्ञान निर्देशांकासह इन्फोसिसच्या भावातही आणखी पावणे दोन टक्क्यांची घट दिसून आली. मात्र आता सर्वच दलाल पेढय़ांना इन्फोसिस या भावात गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. गेल्या दोन दिवसात सीएलएसए, जेपी मॉर्गन, क्रेडिट सुईस, यूबीएस, बँक ऑफ अमेरिका- मेरिल लिंच या विदेशी दलाल पेढय़ांनी इन्फोसिसमध्ये गुंतवणुकीची शिफारस करणारे अहवाल प्रसिद्ध केले आहेत. इन्फोसिसचे एका वर्षांनंतरचे लक्ष्य हे रु. २६०० ते २८०० या दरम्यान राहील, असे अंदाज या अहवालात नमूद करण्यात आले आहेत.
रिलायन्सच्या चांगल्या निकालांच्या अपेक्षेने निर्देशांकाची उसळी
आशियातील बहुतेक शेअर निर्देशांक खाली असूनसुद्धा भारतातील दोन्ही प्रमुख शेअर निर्देशांकांनी मंगळवारी दमदार सलामी दिली. निकाल हंगामातील दुसरा महत्त्वाच्या कंपनीचा अर्थात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निकालांबाबत सकारात्मकतेने दोन्ही निर्देशांकांनी कालच्या तुलनेत दोन टक्क्यांहून अधिक कमाई करीत दिवसअखेर विश्राम घेतला.
First published on: 17-04-2013 at 02:48 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in index number because of good result of reliance