येस बँकेपाठोपाठ एचडीएफसीकडून व्याजदर वाढ
गेल्या आठवडय़ात येस बँकेने तर बुधवारी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेनेही कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेने तिच्या आधार ऋणदरात ०.२० टक्के वाढ केली असून यामुळे बँकेची कर्जे महागणार आहेत.
एचडीएफसी बँकेने आधार दर (बेस रेट) सध्याच्या ९.६० टक्क्यांवरून ९.८० टक्के असा केला असला तरी हा बँकिंग क्षेत्रातील सर्वात कमी व्याजदर आहे. नव्या दराची अंमलबजावणी ३ ऑगस्टपासूनच लागू झाली आहे. या आधार दरापेक्षा कमी पातळीवर बँकेला कर्ज व्याजदर आकारता येणार नाही. म्हणजेच बँकेमार्फत घेतले जाणारे गृह, वाहन आदी कर्ज या वाढीव पातळीइतके महाग होणार आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने व्यापारी बँकांकडील रोकड तरलतेवर मर्यादा घातल्यानंतर खासगी क्षेत्रातील येस बँकेने सर्वप्रथम कर्ज दर वाढविले होते. तर निधीची चणचण दूर करण्यासाठी ठेवींवरील व्याजदरही खासगी बँकांनी गेल्या आठवडय़ात वाढविले आहेत. एचडीएफसी बँकेनेही अलीकडेच ठेवींवरील दर एक टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत. ठेवींवरील नव्या व्याजदरांची अमलबजावणी २७ जुलैपासून झाली आहे.

Story img Loader