तमाम विश्लेषकांचा अंदाज खोडून काढत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने गेल्या तिमाहीत तब्बल ३२ टक्क्यांची झेप निव्वळ नफ्यात नोंदविली आहे. नैसर्गिक वायू उत्पादनातील घट असली तरी तेलशुद्धीकरण व्यवसायातील फायदा कंपनीच्या पथ्यावर पडला आहे.
वस्त्रोद्योग ते दूरसंचार अशा व्यवसायाचे नेतृत्व करणाऱ्या रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या यशाला ‘शुद्धीकरणातील लाभामुळेच गेल्या आर्थिक वर्षभरात एकूण व्यवसाय वाढ झाल्या’ची पावती दिली आहे. सार्वजनिक ओएनजीसीनंतर सर्वात फायदेशीर कंपनी म्हणून रिलायन्सचा गौरव होतो.
कंपनीने जानेवारी ते मार्च २०१३ या गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत ५,५८९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. सलग चार तिमाहीत नफ्यातील घसरण नोंदविल्यानंतर कंपनीने दुसऱ्या तिमाहीत याबाबत वाढीव लाभ मिळविला आहे. शेल वायू उत्पादनासाठी अमेरिकेच्या बीपीबरोबर असलेल्या भागीदारीतील व्यवसाय तसेच यामार्फत होणारा किरकोळ व्यवसायही वधारून १०,००० कोटी रुपयांची सीमा ओलांडता झाला आहे. २०१२-१३ या एकूण आर्थिक वर्षांत कंपनीच्या निव्वळ नफ्यातही ४.८ टक्के वाढ होऊन तो २१,००३ कोटी रुपये झाला आहे.
स्व. धीरुभाई अंबानी संस्थापित रिलायन्समार्फत जगातील सर्वात मोठा इंधन शुद्धीकरण प्रकल्प गुजरातच्या जामनगर येथे कार्यान्वित केला जातो. कंपनीच्या व्यवसायात सर्वाधिक हिस्सा असलेल्या इंधन शुद्धीकरणाच्या माध्यमातून प्रति पिंप सरासरी १०.१ डॉलरची मिळकत राखली आहे. वर्षभरापूर्वी हेच प्रमाण प्रति पिंप ७.६ डॉलर पिंप होते. आघाडीच्या सरकारी तेल शुद्धीकरण कंपन्यांचेही गेल्या काही कालावधीतील सरासरी प्रति पिंप उत्पन्न ५ डॉलरच्या आतच आहे. दरम्यान, कंपनीच्या विक्री आणि कर्जात मात्र गेल्या तिमाहीत वाढ होऊन ती अनुक्रमे ८६,६१८ कोटी रुपये व ७२,४२७ कोटी रुपये झाली आहे.
उत्कृष्ट निकालांची परंपरा रिलायन्सने आणखी एका वर्षांत कायम राखणे सध्याच्या बिकट, अस्थिर वातावरणात तर खूपच उल्लेखनीय ठरते. तेलशुद्धीकरण व्यवसाय वाढल्यामुळेच ही वृद्धी नोंदली गेली आहे. उत्तर अमेरिकेतील व्यवसायातील लाभाचाही समूहाच्या नफ्यात सिंहाचा वाटा आहे.
 मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज

Story img Loader