दक्षिणेतील तामिळनाडूत बाहुल्य असलेल्या खासगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकेने नव्याने उभ्या राहत असलेल्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सेवासामर्थ्यांवर भर देण्याबरोबरच पश्चिम भारतात महाराष्ट्र व गुजरातमध्ये अस्तित्त्व विस्तारण्याचे पद्धतशीर नियोजन आखले आहे. यातून महाराष्ट्रातील सध्याच्या २४ शाखांमध्ये आणखी १४ नवीन शाखांमध्ये भर घातली जाईल.
बँक कायद्यातील सुधारणांमुळे खासगी उद्योगांच्या प्रचंड संसाधनासह येऊ घातलेल्या नव्या बँकांच्या स्पर्धेला सामोरे जाण्याची आपण पूर्ण ताकदीने तयारी केली आहे, असे यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना करूर वैश्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्याधिकारी के. वेंकटरमण यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षांमध्ये ७२ हजार कोटींचे व्यावसायिक लक्ष्य गाठणारी आपली बँक २०१६ पर्यंत म्हणजे स्थापनेचे शतकमहोत्सवी वर्ष साजरे करताना १ लाख २५ हजार कोटींचा एकूण व्यवसाय करेल, असे  ठोस नियोजनही त्यांनी सांगितले.  
करूर वैश्य बँकेच्या देशातील ५०० व्या शाखेचे मुंबईत घाटकोपर येथे मंगळवारी रिअर एंटरप्राइजेसचे संस्थापक व बँकेतील एक मोठे गुंतवणूकदार असलेले राकेश झुनझूनवाला यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुंबईतील ही बँकेची १३ वी शाखा युनिव्हर्सल स्कूल बिल्डिंग, टिळक रोड, विक्रांत सर्कलशेजारी, घाटकोपर येथे सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील आगामी शाखा विस्ताराचे नियोजन स्पष्ट करताना वेंकटरमन यांनी येत्या काळात आणखी १४ शाखा सुरू करणार असल्याचे सांगितले. लवकरच मुंबईत गोरेगाव आणि मालाड येथे तर अमरावती येथे एक शाखा सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.     

देशातील विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी सरकार येत्या महिन्यात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करेल. गुंतवणूकदारांच्या समस्यांशी निगडित करविषयक बाबींचा यात अंतर्भाव असेल. याबाबत महसुल तसेच वित्त सचिवांबरोबरही चर्चा झाली आहे.
– आनंद शर्मा,
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री (बुधवारी दिल्लीत)

Story img Loader