सेन्सेक्स ४१,६०० नजीक; निफ्टीत ४१ अंश भर
मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धसदृश स्थिती निवळल्याचे स्वागत सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारात झाले. सत्रात ३२३ अंश उसळी घेतल्यानंतर सेन्सेक्स सप्ताहअखेर १४७.३७ अंश वाढीसह ४१,५९९.७२ वर बंद झाला. तर आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात ४०.९० अंश वाढीसह निफ्टी १२,२५६.८० पर्यंत स्थिरावला.
इन्फोसिसच्या रूपाने शुक्रवारपासून सुरू झालेल्या कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांची दखलही बाजारात शुक्रवारी घेतली गेली. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत वाढता रुपया व कमी होणाऱ्या खनिज तेलाच्या किमती याबाबतही गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही प्रमुख निर्देशांकात प्रत्येकी पाव टक्क्याहून अधिक वाढ नोंदली गेली. तर सप्ताह तुलनेत मुंबई निर्देशांक १३५.११ अंशांनी व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी या दरम्यान ३०.१५ अंशांनी वाढला.
दुहेरी अंकातील नफावृद्धीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणारा इन्फोसिस सेन्सेक्समध्ये तेजीच्या यादीत अव्वल राहिला. त्याचे समभागमूल्य सत्रअखेर १.४७ टक्क्याने वाढले. तसेच अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, कोटक महिंद्र बँक, एशियन पेंट्स यांनाही मागणी राहिली. सेन्सेक्समधील इंडस्इंड बँक, आयसीआयसीआय बँक, टायटन कंपनी, भारती एअरटेल यांचे मूल्य मात्र एक टक्क्यापर्यंत घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, पोलाद, वाहन, भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान जवळपास दोन टक्क्यापर्यंत वाढले.
इन्फोसिस तेजीत अव्वल
दुहेरी अंकातील नफावृद्धीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणारा इन्फोसिस सेन्सेक्समध्ये तेजीच्या यादीत अव्वल राहिला. चालू आर्थिक वर्षांसाठी उत्पन्न व नफ्याच्या अंदाजात कंपनीने वाढ जाहीर केली आहे. कंपनीमध्ये आर्थिक घोटाळ्याचे कुठलेच पुरावे कंपनीच्या लेखापरीक्षण समितीला मिळाले नाही. परिणामी कंपनीचे समभागमूल्य सत्रअखेर १.४७ टक्क्याने वाढले.