सर्वात मोठी सोने मागणी नोंदविणाऱ्या भारतावर शेजारचा चीन देश यंदा मात करणार आहे. संपूर्ण २०१२ मध्ये सोने आयातीच्या बाबत चीन भारतापेक्षा सरस कामगिरी बजावेल, असा अंदाज ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने व्यक्त केला आहे. जुलै ते सप्टेंबरमध्ये भारतात सोने मागणीत वाढ झाली असली तरी वर्षअखेपर्यंत चीनच याबाबत पुढे असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.
वित्तीय तूट कमी करण्यासाठी सोने आयातीवर सरकाने चालू वर्षांपासूनच मोठय़ा प्रमाणात र्निबध आणले होते. यामध्ये मौल्यवान धातूवरील आयातशुल्क तसेच कर वाढ यांचाही समावेश होता. याचा परिणाम लगेचच दिसून आला. गेल्या वर्षांत जवळपास १,००० टन सोने आयात नोंदविणाऱ्या भारताची यंदाची आयात सध्याच्या कालावधीपर्यंत ६०० टनाच्या आतच आहे.
‘वल्र्ड गोल्ड कौन्सिल’चे व्यवस्थापकीय संचालक मार्कस ग्रुब यांनी वृत्तसस्थेला सांगितले की, सोने आयातीत भारत आणि चीन हे दोन आघाडीचे आहेत. यंदा मात्र त्यांच्यातील फरक हा ५० टनचा असू शकतो. अर्थात त्यातही चीनचीच आघाडी असेल. गेल्या तिमाहीत चीनच्या तुलनेत भारताने सोने मागणी अधिक नोंदविली आहे. तरीदेखील चीनमधील एकूण आर्थिक स्थिती पाहता वर्षअखेपर्यंत थोडय़ाशा फरकाने का होईना चीन अधिक सोने आयात राखेल. सध्या भारताची सोने आयात चीनपेक्षा अधिक असून आतापर्यंत ती ६१२ टन झाली आहे. तर चीनची सध्याच्या कालावधीपर्यंतची सोने मागणी कमी, ६०५ टन आहे. वर्षअखेर मात्र हे चित्र बदललेले असेल, असेही ग्रुब यांनी म्हटले आहे.