भारत – अमेरिकेतील व्यापार येत्या दशकभरात ५०० अब्ज डॉलरच्या घरात जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांत १०० अब्ज डॉलपर्यंत गेलेला उभय देशांमधील व्यापार एवढय़ाच कालावधीत पाच पट उलाढाल नोंदवेल, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.
भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय) आणि अमेरिका-भारत व्यवसाय परिषद (युएसआयबीसी) या दोन व्यापार व्यासपीठावरून मास्टरकार्डचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा यांनी याबाबतचा आशावाद गुरुवारी मुंबईत व्यक्त केला. महासंघाचे अध्यक्ष व उद्योगपती अदि गोदरेज तसेच परिषदेचे अध्यक्ष रोन सोमर्स हेही उपस्थित होते. बराक ओबामा यांच्या दुसऱ्या कारकिर्दीच्या रुपाने अमेरिकेत तर नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अमेरिका आणि भारत या दोन देशां दरम्यान गुंतवणूकपूरक वातावरण तयार होत असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.