जागतिक आर्थिक मंदीपोटी आक्रसलेल्या देशाच्या निर्यातीला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी भरघोस ३,००० कोटींचे ‘पॅकेज’ जाहीर केले. २०१२-१३ मध्ये ३०० अब्ज डॉलर म्हणजे जैसै थे निर्यातीचे आणि जवळपास २०० अब्ज डॉलपर्यंतच्या व्यापार तुटीचे आकडे गुरुवारी स्पष्ट होताच वाणिज्य व उद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी तमाम निर्यातदारांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या विदेशी व्यापार धोरणाच्या वार्षिक पुरवण्यांच्या माध्यमातून बिकट स्थितीत मदतीचा हात देऊ केला.
शून्य कराने भांडवली वस्तूंची निर्यात करण्यास मुभा असलेली सरकारची लोकप्रिय निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू योजना (ईपीसीजी) आणखी वर्षभरासाठी विस्तारतानाच ती सर्वच क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आहे; तर विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्यासाठी यापूर्वी असलेली किमान जमीन अहर्ताही निम्म्यावर आणण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित व्यवसायासाठीच्या विशेष आर्थिक क्षेत्रासाठी तर कोणतीच किमान मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

वैशिष्टय़े
* ‘ईपीसीजी’च्या लाभाचा मार्च २०१४ पर्यंत सर्व उद्योगक्षेत्रांपर्यंत विस्तार.
* अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध १३४ उपक्षेत्रांना २% व्याजदर सवलतीचा लाभ मिळेल. नॉर्वे आणि व्हेनेझुलामध्ये निर्यातीस करलाभ.
* बहुउपयोगी वस्तू उत्पादित करणारे विशेष आर्थिक क्षेत्रांना किमान जमिनीची गरज १००० हेक्टरवरून ५०० हेक्टरवर आणण्यात आली आहे, तर ठराविक उद्योगातील विशेष आर्थिक क्षेत्रांना ५० हेक्टपर्यंतची जमीन मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
* विशेष आर्थिक क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी मालकी हस्तांतरणाची तसेच व्यवसाय विक्रीची विकसकांना मुभा. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील विशेष आर्थिक क्षेत्रात अस्तित्व राखणाऱ्या विकसकांना किमान ‘बिल्ट-अप’ जागेचे निकष लावण्यात येणार आहेत.

२०१२-१३मध्ये निर्यातीत १.७६% घसरण
जागतिक बाजारपेठेतील नैराश्यापायी २०१२-१३मध्ये देशाची निर्यात १.७६ टक्क्यांनी घसरून ३००.६ अब्ज डॉलरवर येऊन ठेपली आहे; तर मार्च २०१३ मध्ये सलग तिसऱ्या महिन्यातील ६.९७ टक्क्यांची मासिक वाढीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून भारताच्या निर्यातीबाबत संमिश्र चित्र पुढे आले. सरलेल्या मार्चमध्ये निर्यात ३०.८ अब्ज डॉलर नोंदली गेली, तर याच महिन्यात आयातही २.८७ टक्क्यांनी घसरल्याने व्यापार तुटीचे प्रमाण वर्षांच्या तुलनेत कमी होऊन १०.३१ अब्ज डॉलरवर स्थिरावले आहे. २०१२-१३ या संपूर्ण वर्षांत मात्र व्यापार तूट वधारून १९०.९१ अब्ज डॉलर झाली आहे.