गेल्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेत उभारी दिसून येत आहे. निवडणुकांनंतर नव्याने येणाऱ्या सरकारने आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी त्वरेने केल्यास सहा टक्क्यांपेक्षा अधिक दराने अर्थव्यवस्थेत वाढ दिसणे शक्य आहे, असे आशावाद भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयचे नवे अध्यक्ष अजय श्रीराम यांनी व्यक्त केला. सीआयआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गुरुवारी मुंबईत पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. आर्थिक विकास दर मंदावण्याच्या मुख्य परिणामांमध्ये रोजगारनिर्मितीला खीळ बसणे असे सर्वात मोठे आव्हानही उभे राहते, याकडे श्रीराम यांनी लक्ष वेधले. त्यामुळे २०१४-१५ वर्षांसाठी सीआयआयने ‘अर्थवृद्धीला वेग, रोजगाराला चालना’ असे ब्रीद ठेवून आपली कार्यक्रमपत्रिका आखल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण सरकारला १०० दिवसांचा कृती आराखडाही सादर केला आहे, तो जर अमलात आल्यास १५ कोटी नोकऱ्या आगामी १० वर्षांत निर्माण केल्या जाऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी, व्याजाचे दर किमान एका टक्क्याने खालावणे, अनुदानांचे प्रमाण हे सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १.७ टक्के मर्यादेत राखणे आणि कामगार कायद्यात सुधारणा या गोष्टी नव्या सरकारने अग्रक्रमाने व ताबडतोब करायला हव्यात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा