बडय़ा १६ कंपन्यांसह बँकांचा करभरणा रोडावला

निश्चलनीकरणातून उद्योगक्षेत्रावर केलेल्या कुटिराघाताचे स्पष्ट संकेत अग्रिम करभरणा करण्याच्या तिसऱ्या तिमाहीतील १५ डिसेंबर या मुदतीपर्यंत जमा रकमांनी दिला आहे. कर निर्धारण वर्ष २०१५-१६ मधील याच हप्त्यात जमा झालेल्या रकमांच्या तुलनेत किमान १६ बडय़ा कंपन्यांच्या अग्रिम कराच्या रकमेत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारच्या तिजोरीत कंपन्या, उद्योग समूहामार्फत जमा होणाऱ्या अग्रिम कर संकलनात देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा सिंहाचा वाटा आहे. आघाडीच्या बँकांचे अग्रिम कराचे प्रमाण यंदा लक्षणीय रोडावले असून अनेक खासगी कंपन्यांनीही यंदाच्या तिमाहीत ऑक्टोबर ते डिसेंबर २०१५ च्या तुलनेत कमी कर भरला आहे. कमी कर म्हणजे कंपन्यांच्या आर्थिक महसूल आणि नफ्याबाबत चिंता व्यक्त करण्यासारखी स्थिती असल्याचे मानले जाते.

मुंबईस्थित ४३ बडय़ा कंपन्यांनी डिसेंबरअखेरच्या तिमाहीकरिता २७,३२१ कोटी रुपयांचा अग्रिम कराचा भरणा केला असून वार्षिक तुलनेत त्यात अवघी  १० टक्के वाढ नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी अग्रिम कराची १५ डिसेंबरअखेर रक्कम २४,८११ कोटी रुपये होती.

करभरणा घसरलेल्या कंपन्यांमध्ये ग्राहकोपयोगी उत्पादनांतील सर्वात मोठी कंपनी हिदुस्तान युनिलिव्हरचा समावेश असून, रोकडचणचणीमुळे घसरलेल्या एकंदर मागणीची कंपनीच्या विक्रीला बसल्याचे स्पष्ट होत आहे. मागील वर्षांतील ६२० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा १० टक्के कमी ५६० कोटी रुपयांचा करभरणा कंपनीने केला आहे.

स्टेट बँकेने १,२८२ कोटी रुपये (-२५%), आयसीआयसीआय बँकेने १,२०० कोटी रुपये (-२७.३%), एलआयसीने २,२३५ कोटी रुपये (+१३%), एचडीएफसी बँकेने २,३०० कोटी रुपये (+१६.७५%) व एचडीएफसी लिमिटेडने ९२० कोटी रुपये अग्रिम कर भरला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा कर १० टक्क्यांनी तर येस बँकेचा कर ४४ टक्क्यांनी वाढला आहे. टीसीएसचा अग्रिम कर वर्षभरापूर्वीच्या १,६०० कोटींवरून यंदा १,५४० कोटी रुपये झाला आहे. तर टाटा स्टीलचा कर ११.११ टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीने यंदा ४०० कोटींचा अग्रिम कर भरणा केला आहे.

सरकारी तेल व वायू विक्री व विपणन कंपन्यांचा कर भरणा दुहेरी अंकांनी वाढला आहे. हिंदुस्थान यूनिलिव्हर व बजाज ऑटो यांनी यंदा अनुक्रमे ९.६८ व १७.९ टक्के कमी कर भरला आहे.

untitled-22