एकीकडे चालू खात्यातील तूट सुधारत असल्याचे दिसत असले तरी देशावरील विदेशी कर्जदायित्वाची बिघडत असलेली स्थिती धोक्याची घंटा असल्याचे रिझव्र्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडय़ांतून दिसून येते. गंभीर बाब म्हणजे रुपयाच्या ताज्या वादळी घसरणीतून देशाच्या विदेशी चलन गंगाजळीला वेगाने कात्री लागलीच, पण ती इतकी की देशाच्या एकूण विदेशी कर्जदायित्वापेक्षाही तोकडी झाल्याचे आता दिसून येत आहे.
मार्च २०१३ अखेर देशावरील विदेशी कर्ज ३९० अब्ज डॉलरवर पोहचले असल्याचे रिझव्र्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या शुक्रवार, १४ जूनपर्यंतच्या रिझव्र्ह बँकेनेच उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारताची विदेशी चलन गंगाजळीची स्थिती २९०.७ डॉलर अशी होती.
गेल्या सलग ११ वर्षांत देशावरील विदेशी कर्ज निरंतर वाढत आले आहेच, पण मार्च २०१३ अखेर ते गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तब्बल १२.९ टक्क्यांनी वधारले आहे. देशाच्या एकूण कर्जदायित्वात उद्योगधंद्यांच्या विदेशातून कर्ज-उभारणीचा हिस्सा एकतृतीयांश इतका आहे. उल्लेखनीय म्हणजे बाब म्हणजे अमेरिकी डॉलरमध्ये परतफेड केल्या जाणाऱ्या कर्जाचा यात सर्वाधिक ५७.२ टक्के असा सिंहाचा वाटा आहे. गेल्या दोन महिन्यांत डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ११ टक्क्यांनी झालेली पडझड पाहता या डॉलररूपी कर्जाचा भारही निश्चितच वाढला आहे.
मागील दशकभराचा वेध घेतल्यास, परकीय कर्जदायित्व आणि विदेशी चलन गंगाजळी यांचे हे गुणोत्तर गेल्या दोन वर्षांत प्रथमच १०० टक्क्यांच्या खाली आले आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील ६०च्या पलीकडे गेलेली ताजी घसरण आणि शेअर बाजारातील विदेशी वित्ताचे वेगवान पलायन पाहता हे व्यस्त प्रमाण आणखी रुंदावत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परकीय कर्जभार
एकीकडे चालू खात्यातील तूट सुधारत असल्याचे दिसत असले तरी देशावरील विदेशी कर्जदायित्वाची बिघडत असलेली स्थिती धोक्याची घंटा असल्याचे रिझव्र्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडय़ांतून दिसून येते. गंभीर बाब म्हणजे रुपयाच्या ताज्या वादळी घसरणीतून देशाच्या विदेशी चलन गंगाजळीला वेगाने कात्री लागलीच, पण ती इतकी की देशाच्या एकूण विदेशी कर्जदायित्वापेक्षाही तोकडी झाल्याचे आता दिसून येत आहे.
First published on: 28-06-2013 at 03:13 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India has external debt of 390 billion