युरोपीय कर्जदारांनी ग्रीसला कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणखी मदत देण्याकरिता घातलेल्या काटकसरीच्या अटींविरोधात तेथील जनतेने मतदान केल्यानंतर युरोची स्थिती अधांतरी आहे. असे असले तरी, त्यामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांचा मुकाबला करण्यासाठी सरकारने पूर्वतयारी केली आहे. आपल्या देशाकडे मोठय़ा प्रमाणावर परकीय चलनसाठा आहे, असे व्यापार व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ग्रीसमधील स्थितीचा भारतावर जो परिणाम होत आहे त्याच्यावर आमचे बारीक लक्ष आहे. परकी चलनसाठा पुरेसा असल्याने परिणामांना तोंड देण्यास भारत सक्षम आहे. सरकार व रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया घडामोडींवर संयुक्तपणे लक्ष ठेवित असून ग्रीसमधील आर्थिक पेचप्रसंगामुळे भारताच्या आर्थिक भवितव्याला धक्का बसण्याची शक्यता नाही.
भाजप शासित मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केल्याने आता यावर आणखी वाद घालण्याची गरज वाटत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India has healthy economy nirmala sitaraman