२ लाख कोटींच्या मालमत्ता विक्रीचे कयास
अनेक प्रकारच्या मालमत्ता आहेत तरी बँकांची कर्जे थकविणाऱ्या कंपन्यांवर त्यांच्या या मालमत्तांची विक्री करून कर्जफेड करण्याचा बँकांकडून दबाव वाढला असून, चालू वर्षांत अशा २ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तांच्या विक्रीचे कयास केले जात आहेत.
स्टेट बँकेचा संशोधन विभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या टिपणांत, सुमारे १० लाख कोटींचे एकंदर कर्जदायित्व असलेल्या शेकडो कर्जबाजारी कंपन्यांच्या मालमत्तांच्या विक्रीतून चालू वर्षांतच २ लाख कोटी रुपये वसूल केले जातील, असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. यापैकी १० टक्के विक्री ही रीतसर बोली लावून होण्याचा अंदाज आहे.
अनेक मोठी रोकड असलेल्या कंपन्या तसेच विदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदारही या संधीच्या प्रतीक्षेत आहेत, असे प्रतिपादन स्टेट बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि आर्थिक संशोधन विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. सौम्य कांती घोष यांनी केले.
या टिपणाने, सरलेल्या आर्थिक वर्षांत २७० कंपन्यांनी त्यांच्यावरील कर्जओझे ४७,८१३ कोटी रुपयांनी कमी केल्याचे स्पष्ट केले आहे. ओएनजीसी, बजाज होल्डिंग, जीएमडीसी, एमएमटीसी, ल्युपिन, डीसीएम श्रीराम आणि काही औषधी कंपन्यांनी त्यांचे कर्जदायित्व लक्षणीय कमी केले आहे. ऊर्जा, पायाभूत सोयीसुविधा, पोलाद, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांवर मोठा कर्जभार आहे.
लक्षवेधी सौदे..
’ पिरामल समूहाने गेल्या महिन्यांत, सांघी इंडस्ट्रीजच्या कर्जरोखे विक्रीत २५७ कोटी रुपये गुंतविले, ज्यायोगे त्या कंपनीला बँकांची आंशिक कर्जफेड शक्य बनली आहे.
’ लॅन्को समूहाने (४७,१०२ कोटींचा कर्जभार) उडपीस्थित प्रकल्प ६,३०० कोटींना अलीकडेच विकला. ऊर्जा क्षेत्रातील एकंदर २५,००० कोटींच्या मालमत्तांची विक्री करून, बँकांच्या १८,००० कोटींच्या कर्ज फेडण्याचा लॅन्कोने निर्णय घेतला आहे.
’ रिलायन्स एडीएजी (५९,७६१), एस्सार स्टील (५०,०००), जयप्रकाश असोसिएट्स (२५,२००), लॅन्को (२५,०००) जीव्हीके (१०,०००), व्हिडीयोकॉन (९,०००), वेदान्त (६,६००), अदानी (६,०००) वगैरेंचा संभाव्य मालमत्ता विक्रीचे (कोटी रुपयांतील कंसातील आकडे ) नियोजन आहे.
’ यापैकी अनेक मालमत्तांची विक्री पूर्ण झाली आहे, तर अनेक सौदे मार्गस्थ आहेत. परिणामी वर उल्लेख आलेल्या कंपन्यांचा कर्ज-भांडवल गुणोत्तर २०१४च्या तुलनेत सुधारले आहे.