नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे चढत्या महागाईचे कठीण आव्हान कायम असून सोमवारी ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारित किरकोळ महागाई दराच्या सात टक्क्यांवर पोहोचलेल्या आकडेवारीने दाखवून दिले. दुसरीकडे देशाच्या कारखानदारीने अपेक्षित सुदृढता मिळविता आली नसल्याचे, जाहीर झालेल्या जुलैतील अवघ्या २.४ टक्क्यांच्या औद्योगिक उत्पादनातील वृद्धी दराने दर्शविले.
केंद्राच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सलग आठव्या महिन्यांत रिझव्र्ह बँकेसाठी सहनशील असणाऱ्या सहा टक्क्यांच्या कमाल पातळीपेक्षा किरकोळ महागाई दर अधिक राहिला असून, तो सरलेल्या ऑगस्टमध्ये ७ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाई दराने ६.७१ टक्क्यांची पाच महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली होती. अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या कडाडलेल्या किमतीमध्ये वाढ झाल्याने, किरकोळ महागाई दरात ऑगस्टमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. अन्नधान्याचा महागाई दर ऑगस्ट महिन्यात ७.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो जुलैमध्ये तो ६.६९ टक्के नोंदवला गेला होता. तर गेल्या वर्षी (ऑगस्ट २०२१) तो ३.११ टक्के राहिला होता. भाजीपाला आणि डाळींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एकूणच अन्नधान्याच्या महागाई दरात वाढ झाली. सरलेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती १३.२३ टक्क्यांनी वाढल्या. त्याचबरोबर उच्च प्रथिनेयुक्त आहार अर्थात अंडी, मांस आणि मासे यांची ऑगस्टमधील किंमतवाढ ही ०.९८ टक्के अशी राहिली, असे आकडेवारी सांगते. कपडे आणि पादत्राणे यांच्या किमतीत जुलैमधील ०.९१ टक्क्यांवरून वाढ होत ती ९.९१ टक्क्यांवर पोहोचली आहे.