अर्थसंकल्पात भांडवली बाजार व म्युच्युअल फंडावर उगारलेला करबडगा आणि अमेरिकेतील शेअर मार्केटमधील घडामोडींचे पडसाद सोमवारी भारतातील शेअर बाजारावर उमटले. सोमवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स ४०० अंशांनी तर निफ्टी १५० अंशांनी घसरला.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला होता. यात त्यांनी समभागांवरील दीर्घकालीन लाभावरील कर आणि म्युच्युअल फंडांच्या लांभांशांवरील कर प्रत्येकी १० टक्के प्रस्तावित केला होता. शुक्रवारी याचे पडसाद उमटले होते. शेअर बाजारने अडीच वर्षांचा तळ गाठला होता. शुक्रवारी सेन्सेक्स ८४० अंशांनी तर निफ्टी २५६ अंशांनी घसरला होता. यात जवळपास साडे चार लाख कोटी रुपयांची नुकसान झाले होते.
सोमवारी देखील शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. अमेरिकेतील शेअर मार्केटमधील मंदीमुळे सोमवारी आशियातील बहुसंख्य शेअर मार्केटमध्ये घसरण झाली. भारतातही हीच परिस्थिती होती. सकाळी सेन्सेक्स ४०० अंशांनी घसरुन ३५ हजारांच्या खाली आला. तर निफ्टीमध्येही १५० अंशांची घसरण झाली. मात्र, काही वेळातच शेअर बाजार सावरला. सोमवारी देखील बँकांच्या शेअरच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.