सरकार राबवीत असलेल्या विविधांगी आर्थिक सुधारणांच्या परिणामी व्यापार-उद्योगास अनुकूल वातावरणासंबंधीच्या (इज ऑफ डुइंग बिझनेस) जागतिक मानांकनात भारताचे स्थान आगामी दोन दशकात वेगाने चढत जाईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
जागतिक बँकेने उद्योगानुकूल वातावरणाच्या निकषावर लावलेल्या क्रमवारीत १८९ देशांमध्ये भारताचे स्थान सध्या १३०व्या क्रमांकावर आहे. जरी सरलेल्या वर्षांत भारताने एकदम चार पायऱ्या वर चढणारी कामगिरी केली असली, तरी ८४व्या स्थानावर चीनच्या तुलनेत ते खूप खाली आहे. नवा उद्योग-व्यवसाय थाटण्यास सर्वात अनुकूल देश म्हणून सिंगापूर या क्रमवारीत सर्वात वरचे मानांकन प्राप्त झाले आहे.
जपानच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर असलेले अर्थमंत्री जेटली यांनी आर्थिक सुधारणांचा सरकारकडून सुरू असलेला पाठपुरावा पाहता, पुढील १-२ वर्षांत उद्योगानुकूलतेच्या जागतिक क्रमवारीतील भारताचे स्थान लक्षणीय सुधारेल, याबद्दल आपल्याला जराही शंका नसल्याचे नि:संदिग्धपणे सांगितले. करप्रणालीत गत दोन वर्षांत केल्या गेलेल्या महत्त्वाच्या बदलांचा तपशील त्यांनी याप्रसंगी दिला.
जपानी गुंतवणूकदारांना उद्देशून ते म्हणाले, ‘जपानचे तंत्रज्ञान आणि नावीन्यतेचा भारतातील मनुष्यबळाशी मेळ हा भारतासारख्या विशालतम बाजारपेठेत खूपच लाभदायी ठरेल. या बाजारपेठेची क्रयशक्ती निरंतर वेगाने वाढतच आहे. त्यामुळे जपानी कंपन्यांनी या आकर्षक बाजारपेठेचा संदर्भ लक्षात घेऊन भारताकडे पाहायला हवे.’
जेटली म्हणाले की, आगामी काही दशकात सामान्य भारतीयांचे दरडोई उत्पन्न लक्षणीय स्वरूपात वाढेल, असा सध्याच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा आहे. त्यामुळे ज्यांनी आजवर भारतात प्रवेश केला नाही त्यांनी या देशाकडे दृष्टी वळविण्याची ही सुयोग्य वेळ आहे. आपली बाजारपेठ स्वागतासाठी खुली आहे आणि प्रवेशाची प्रक्रिया खूपच सोपी व व्यापक बनली आहे.
जगातील सर्वात वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारताकडे जे दुर्लक्ष करतील, ते उमद्या संधीला गमावतील, अशी पुस्ती जेटली यांनी जोडली. भारताला जागतिक स्तरावर संधी असल्याचे ते म्हणाले.
अर्थव्यवस्थेचा सरस वृद्धीदर सरकारच्या वृद्धीपूरक धोरणांतूनच!
टोक्यो : सरकारच्या वृद्धीपूरक धोरणांच्या परिणामीच भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढीचा दर अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढून, जानेवारी ते मार्च २०१६ तिमाहीत ७.९ टक्के नोंदविला गेला आहे. हे आकडे अप्रस्तुत नसून, अर्थव्यवस्थेच्या अंगभूत सामर्थ्यांचे ते प्रतीक आहेत, असे प्रतिपादन अर्थमंत्री जेटली यांनी केले. अनेक घटक प्रतिकूल होते, जागतिक मंदीचे सावट आणि सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस असतानाही अर्थव्यवस्थेने जगात सर्वात वेगाने वाढीची आश्चर्यकारक कामगिरी केली. आगामी काळात, सुधारणा पथाला गती, वस्तू व सेवा कराची पावसाळी अधिवेशनात मंजुरी आणि दमदार पाऊस झाल्यास अर्थव्यवस्थेच्या या ऊध्र्वगामी कलाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला.

Story img Loader