नवी दिल्ली : अन्नधान्य विशेषत: सामान्यांच्या दैनंदिन आहारातील प्रथिनेयुक्त जिनसांच्या किमती वधारल्या असल्या तरीही उत्पादित वस्तूंच्या किमती नरमल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराने ऑगस्टमध्ये १२.४१ टक्के अशी अकरा महिन्यांतील नीचांक पातळीवर घसरण दाखविली आहे.
सलग तिसऱ्या महिन्यात या दराने दाखविलेली ही घसरण असून, गेल्या महिन्यात हा दर १३.९३ टक्के पातळीवर होता, तर वर्षभरापूर्वी म्हणजे ऑगस्ट २०२१ मध्ये तो ११.६४ टक्के पातळीवर होता.
ऑगस्ट महिन्याच्या किरकोळ महागाई दराने ७ टक्के असा दाखविलेला चढ पाहता, घाऊक महागाईचा दर घसरणे ही उसंतच म्हणता येईल. मात्र मागील वर्षांतील एप्रिलपासून सलग १७ व्या महिन्यात घाऊक महागाई दर दोन अंकी पातळीवर कायम आहे.
चालू वर्षांत मे महिन्यात घाऊक महागाई दर १५.८८ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर होता आणि दशकभरातील म्हणजे २०१२ नंतरची त्याची ही उच्चांकी पातळी होती. त्या तुलनेत जून, जुलै आणि ऑगस्ट या सलग तिसऱ्या महिन्यात या दरात निरंतर घसरण सुरू असल्याचे ताज्या आकडेवारीने स्पष्ट केले.
घाऊक किंमत निर्देशांकात सर्वाधिक वाटा असलेल्या अन्नधान्याच्या किमती जुलै महिन्यातील १०.७७ टक्क्यांच्या तुलनेत १२.३७ टक्के अशा किंचित वधारल्या आहेत. त्यापाठोपाठ भाजीपाल्याच्या किमतीत तर २२.२९ टक्क्यांची वाढ झाली आहे. जो दर जुलै महिन्यात १८.२५ टक्के होता.
मात्र उत्पादित वस्तूंचा महागाई दर आणि तेलबियांच्या दरातील वाढ अनुक्रमे ७.५१ टक्के आणि उणे १३.४८ टक्के नोंदवली गेल्याने एकूण निर्देशांकावर अंकुश ठेवण्यास ती मदतकारक ठरली. यापाठोपाठ इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील किंमतवाढ ऑगस्टमध्ये ३३.६७ टक्के होती, जी जुलैमध्ये ४३.७५ टक्के पातळीपेक्षा कमी राहिली.
रिझव्र्ह बँक पतधोरण निश्चित करताना किरकोळ महागाई दर गृहीत धरत असली तरी चालू महिन्यात २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान पार पडणाऱ्या द्विमाही पतधोरण आढाव्याच्या बैठकीत, घाऊक महागाई दरात झालेल्या घसरणीची देखील तिच्याकडून दखल घेतली जाण्याची आशा आहे.