भारत हा सहावा मोठा पॅकेजिंग बाजारपेठ असलेला देश असून २०११ मध्ये त्याने २४.६ अब्ज डॉलरची विक्री नोंदविली आहे; येत्या चार ते पाच वर्षांत १२.३% अपेक्षित दराने वाढणारा हा उद्योग चौथी जागतिक बाजारपेठ मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री डॉ. डी. पुरंदेश्वरी यांनी नमूद केले.
देशातील पॅकेजिंग उद्योगाची उलाढाल येत्या पाच वर्षांत ४२.७ अब्ज डॉलर होईल, असेही त्या म्हणाल्या. जागतिक तुलनेतील ६% पेक्षाही अधिक वाटा त्यामुळे भारताचा असेल, असा गौरवही त्यांनी यावेळी केला.
दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंगतर्फे आयोजित इंडियापॅक २०१३ प्रदर्शनाच्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन डॉ. पुरंदेश्वरी यांच्या हस्ते सोमवारी मुंबईत झाले. गोरेगाव (पूर्व) येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित हे प्रदर्शन ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ११ विविध देश यात सहभागी झाले असून एकूण प्रदर्शनकरांची संख्या १२० हून अधिक आहे.  कर्नाटक, झारखंड आणि बिहार या राज्यांचे स्वतंत्र दालनेही येथे आहेत.
प्रदर्शनादरम्यान स्थानिक ४२ तर १८ आंतरराष्ट्रीय वक्तेही सहभागी होत आहेत. पॅकेजिंग उद्योगात प्रक्रिया खाद्य ४८%, वैयक्तिक निगा उत्पादने २७%, औषधे ६% तर इतर १९% या क्षेत्रांचा वाटा आहे. संस्थेचे संचालक प्रा. एन. सी. साहा यांनी देशात २२ हजार पॅकेजिंग कंपन्या असल्याचे यावेळी सांगितले. पैकी ८५% मध्यव व सूक्ष्म उद्योग क्षेत्रे आहेत.
संस्थेचे अध्यक्ष एस. के. रे यांनी म्हटले आहे की, देशातील पॅकेजिंगचा दरडोई वापर ४.३ किलो प्रती माणशी वार्षिक आहे. जर्मनी व तैवान येथील प्रमाण अनुक्रमे ४२ व २० किलो आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या २% हिस्सा हे क्षेत्र राखते, अशी माहिती प्रदर्शनाचे अध्यक्ष सुबोध गुप्ता यांनी यावेळी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा