भांडवली बाजार बुधवारी आणखी खोलात गेला. सेन्सेक्सने २५,५००चा म्हणजे १३ महिन्यांपूर्वी ओलांडलेला स्तरही सोडला आणि चालू वर्षांतील नवीन नीचांक नोंदवला. तर निफ्टीत अर्धशतकी घसरण झाली, मात्र ७,७०० स्तर या निर्देशांकाने जेमतेम सांभाळला.
बुधवारच्या २४२.८८ अंश घसरणीसह सेन्सेक्स २५,४५३.५६ पर्यंत, तर ६८.८५ अंश घसरणीसह निफ्टी ७,७१७.०० पर्यंत खाली आला. विदेशी गुंतवणूकदारांवरील पूर्वलक्ष्यी प्रभावाची करवसुलीची टांगती तलवार दूर झाल्याचे स्वागत करण्याऐवजी गुंतवणूकदारांनी बुधवारी भांडवली बाजारात व्यवहार करताना चीन, युरोप, अमेरिकेतील घसरत्या उत्पादननिर्मितीबाबत चिंता व्यक्त केली.
दोन्ही निर्देशांकांत जवळपास प्रत्येकी एक टक्क्य़ापर्यंत आपटी नोंदली गेली. आठवडय़ातील तिसऱ्या दिवशीही बाजार घसरणीचा प्रवास करणारा ठरला आहे.
मंगळवारच्या भांडवली बाजारातील व्यवहारानंतर विदेशी गुंतवणूकदारांवर किमान पर्यायी कराची पूर्वलक्ष्यी प्रभावाने अंमलबजावणी न करण्याचे सुचविणारा अहवाल सरकारने स्वीकारल्याचे जाहीर केले. त्याचे स्वागत बुधवारच्या व्यवहारात बाजारात होणे अपेक्षित असताना मात्र रात्रअखेर स्पष्ट झालेल्या चीनसह युरोप, अमेरिकेतील संथ निर्मिती क्षेत्राच्या प्रवासाचेच सावट अधिक उमटले.
सेन्सेक्समधील भेल, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, ओएनजीसी, स्टेट बँक, कोल इंडिया हे समभाग घसरले, तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, बँक, भांडवली वस्तू, वाहन, पोलाद हे घसरणीच्या यादीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप किरकोळ घसरला, तर स्मॉल कॅप काही प्रमाणात वाढला.
व्यवहारात २६ हजारांपर्यंत, २५,९३९.३७ वर जाऊ पाहणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेरच्या घसरणीमुळे ८ ऑगस्ट २०१४ नंतरच्या तळात स्थिरावला. मंगळवारी ८,००० चा स्तर सोडणाऱ्या निफ्टीत बुधवारी आणखी घसरण झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक कसाबसा ७,७१० च्या वर राहिला.