मावळत्या अर्थव्यवस्थेचे रुपांतर उद्याच्या विकास वाढीच्या सुर्योदयात होणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहे. अग्रिम करापोटी कंपन्यांकडून भरले जाणारी रक्कम यंदा वधारल्याचे आकडे सकृतदर्शनी दिसत आहेत. अनेक बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या यांनी सरत असलेल्या चौथ्या तिमाहीचा अग्रीम कराचा भरणा गेल्या वर्षांच्या तुलनेत वधारला आहे.
शुक्रवारी चौथ्या हप्त्याच्या अग्रीम कराची आकडेवारी जाहीर होताना ती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे मात्र विश्लेषकांचे म्हणणे आहे. भारतीय कंपन्यांसाठी त्यांच्या नफ्यावर देय असलेल्या अग्रीम करापकी आयकराचा चौथा हप्त्या १५ मार्चपर्यंत देय असतो. बँका, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात मिश्र प्रवाह दिसून आला. देशातील पहिल्या क्रमांकाची स्टेट बँक मात्र याबाबत पिछाडीवर पडली आहे. बँकेने यंदा गेल्या वर्षांच्या १,६५० कोटी रुपयांच्या तुलनेत १,४५० कोटी रुपये भरले आहेत. उलट खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने यंदा भरलेली रक्कम ही गेल्यावेळच्या ४२५ कोटी रुपयांच्या तुलनेत अधिक, ५५० कोटी रुपये आहे. एचडीएफसीनेही ६०० कोटींपेक्षा अधिक ७०० कोटी रुपये अदा केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील एलआयसीनेही ९७१ कोटींपेक्षा अधिक १,०८० कोटी रुपये अग्रीम कर म्हणून भरले आहेत.
आर्थिक राजधानीचा हिस्सा वाढला
वाढत्या अग्रीम करापोटी अर्थव्यस्थेला हातभार लावू पाहणाऱ्या कंपन्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीतील आपले योगदानही उधृत केले आहे. देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात एक तितृयांश हिस्सा राखणाऱ्या मुंबईतून १.७४ लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. ही वाढ १६% टक्के आहे.