कृषी व सेवा क्षेत्राच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीतील राष्ट्रीय सकल उत्पादन ४.७ टक्क्यांपर्यंत उंचावले आहे. आधीच्या तिमाही तुलनेत ते किरकोळ घसरले असले तरी वार्षिक बाबतीत ते वधारले आहे. मात्र संपूर्ण २०१३-१४ चे सरकारचे ४.९ टक्के उद्दिष्ट राखण्यासाठी देशाला आता चौथ्या तिमाहीत तब्बल ५.७ टक्के विकास दर गाठावा लागणार आहे.
शुक्रवारी उशिरा जाहीर झाल्यानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये विकास दर ४.७ टक्के राहिला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या (जुलै ते सप्टेंबर) हा दर ४.८ तर पहिल्या तिमाहीत (४.४ टक्के) तो नोंदला गेला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यातील सकल राष्ट्रीय उत्पादन गेल्या वर्षांतील याच कालावधीतील ४.५ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ४.६ टक्क्यांपर्यंत जाऊ शकले आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने २०१३-१४ साठी ४.९ टक्के राष्ट्रीय सकल उत्पादनाचे लक्ष्य राखले आहे. गेल्या तीनही तिमाहीतील ४.८ टक्क्यांखालील दर पाहता शेवटच्या, चौथ्या तिमाहीत मात्र देशाला आता अवघड अशा ५.७ टक्क्यांचे उत्पादन नोंदविणे भाग पडणार आहे. २०१२-१३ च्या तिसऱ्या तिमाहीत दर ४.४ टक्के होता.
यंदाच्या तिमाहीत शेती क्षेत्राची वाढ ३.६ टक्के राहिली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती अवघी ०.८ टक्के होती, तर यंदाच्या पहिल्या नऊ महिन्यात हे क्षेत्र ३.६ टक्क्याने विस्तारले आहे. वित्त, विमा, गृहनिर्माणसह सेवा क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वीच्या १०.२ टक्क्यांवरून तिसऱ्या तिमाहीत १२.५ टक्के झाली आहे. वीज, वायू व जल पुरवठा क्षेत्रात ५ टक्के अशी दुप्पट वाढ झाली आहे. बांधकाम क्षेत्र मात्र ०.६ टक्के अशा निम्म्या पातळीवर आले आहे. तिसऱ्या तिमाहीत निर्मिती क्षेत्र मात्र १.९ टक्क्यांनी रोडावले आहे. वर्षभरापूर्वी त्याने २.५%वाढ नोंदविली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा