सद्यस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण असल्याच्या चर्चा झडत असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन ‘वासरात लंगडी गाय शहाणी'(one-eyed’ king in land of blind), असे केले आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक संस्थांकडून भारत गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण असल्याचे प्रशस्तिपत्र देण्यात आले होते. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावरील नकारात्मक धक्क्यांपासून वाचवल्याबद्दल राजन यांचेही अनेक जागतिक संस्थांकडून कौतूक करण्यात आले होते.
आपल्याला समाधान वाटेल, असे स्थान अजूनही आपल्याला गाठायचे आहे. आपल्याकडे वासरात लंगडी गाय शहाणी, अशी एक म्हण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्थाही तशीच काहीशी आहे, असे राजन यांनी सांगितले. ‘वॉल स्ट्रीट डिजिटल’चा भाग असणाऱ्या ‘मार्केटवॉच’ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रघुराम राजन यांनी हे मत व्यक्त केले. आमच्या क्षमतेनुसार आम्ही जे काही साध्य करू शकतो, त्याला पुरक अशा गोष्टी सध्या घडत आहेत. केवळ या गोष्टी आमच्या पथ्यावर पडत आहेत, म्हणून हे सर्व घडत आहे. गुंतवणुकीने जोर धरला असून आमच्या अर्थव्यवस्थेत चांगले स्थैर्यही आहे. त्यामुळे आमची अर्थव्यवस्था सगळ्याच धोक्यांपासून सुरक्षित नसली तरी बऱ्याच धोक्यांपासून सुरक्षित आहे, असे राजन यांनी म्हटले. यावेळी राजन यांना भारत आणि चीन यांच्यातील तुलनेविषयी विचारले असता त्यांनी भारत आर्थिक सुधारणांबाबत चीनपेक्षा दशकभर मागे असल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian economy like one eyed king in land of blind says rbi governor raghuram rajan