भारतीय अर्थव्यवस्था सुधारणेच्या प्रवासावर असून ‘गुंतवणुकीसाठी योग्य’ असे देशाचे मानांकन एका पायरीने सुधारण्याचे संकेत आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे देण्यात आले आहेत. नियोजित वेळेपूर्वी असे मानांकन उंचावले जाऊ शकते, असा या संस्थांचा कयास आहे.
‘सुमार कालावधी सरला आहे’ अशा शब्दात बँक ऑफ अमेरिका मेरिल लिन्चने भारताचे विद्यमान चित्र स्पष्ट केले आहे. देशातील आर्थिक स्थिती सुधारत असून भारताचे पतमानांकन नियोजित कालावधीपूर्वीच अद्ययावत केले जाऊ शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.
भारताचे पतमानांकन उंचावण्यासाठी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील वित्तमंत्री, सचिव यांनी मानांकन संस्थाप्रमुखांशीही भेट घेतली होती.
ब्रिटनची दलाल पेढी असलेल्या बार्कलेजनेही देशाबाबत असाच आशावाद व्यक्त केला आहे. २०१७ पर्यंत भारताचे पतमानांकन सध्याच्या ‘बीबीबी-(उणे)’ ते ‘बीबीबी’ (स्थिर) असे केले जाऊ शकते, असे बार्कलेजने म्हटले आहे. शाश्वत वधारती वाढ, तुलनेने स्थिर महागाई आणि प्रगतिपथावरील वित्तीय सुधारणा या जोरावर देशाच्या विदेशी चलनाचे मानांकनदेखील उंचावले जाऊ शकते, असेही बार्कलेज म्हणते.
‘मूडिज’कडून ब्राझीलसारख्या देशाचे मानांकन (बुधवारी) कमी केले असले तरी भारतासारख्या देशाबाबतचा आगामी दृष्टिकोन सकारात्मकच असेल, असे बँक ऑफ अमेरिका मेरिल लिन्चने म्हटले आहे. देशाचे पतमानांकन उंचावण्यासाठी पुरेसा वाव आहे, असेही ही संस्था म्हणते. भारताचा विकास दर २०१८ पर्यंत ८ टक्क्यांवर पोहोचण्यासह महागाई तसेच वित्तीय व चालू खात्यातील तूट कमी होईल, असेही यानिमित्ताने संस्थेने नमूद केले आहे.
२०१२ पासून भारताबाबत ‘स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पूअर्स’ (एस अ‍ॅण्ड पी) व ‘मूडिज’सारख्या संस्थांनी मानांकनाबाबत िंचंता व्यक्त केली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या धोरण लकव्याला त्यासाठी दोष दिला गेला आहे. ‘एस अ‍ॅण्ड पी’ने देशाचे मानांकन ‘बीबीबी-(उणे)’ असे नकारात्मक स्थितीत आणून ठेवले होते. एप्रिल २०१२ पूर्वी ते ‘बीबीबी’ असे स्थिर होते. तर ‘मूडिज’ने ‘बीएएए३’ असे स्थिर मानांकन दिले आहे.