यंदाचा चांगला मान्सून आणि स्थगित प्रकल्पांना केंद्र सरकारच्या निर्णयाने मिळालेली चालना याच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था वर्षअखेपर्यंत उभारी घेईल, असा विश्वास रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केला. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राजन यांनी या वेळी व्याजदराबाबत मात्र कोणतेही भाष्य केले नाही.
केम्ब्रिजमधील हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या भाषणात राजन यांनी ‘व्याजदर वाढणार की नाही? याबाबत मी काहीही सांगणार’ असे वक्तव्य कर हा विषय उधळून लावला. रिझव्र्ह बँकेचे तिमाही पतधोरण २९ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून सप्टेंबरमध्ये वाढलेल्या महागाई दराची आकडेवारी पाहता दर कपातीची शक्यता मावळली आहे. आपल्या पहिल्या पतधोरणात राजन यांनी सप्टेंबरमध्ये पाव टक्का रेपो दरवाढ केली होती.
देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल ते म्हणाले की, भारताचा विकासदर चौथ्या तिमाहीत वाढताना दिसून येईल. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील विविध प्रकल्प थंड बस्त्यात होते; मात्र केंद्र सरकारने त्यांना पर्यावरणादी मंजुरी देऊन ते पूर्ववत केले. ११५ अब्ज डॉलर किमतीच्या जवळपास निम्मे प्रकल्प हे बंदच होते. त्याचबरोबर यंदा मान्सून चांगला झाल्याने कृषी, खाद्य आदी उत्पादन अधिक होणार आहे. त्यामुळे कृषीनिगडित इतर क्षेत्राची वाढही यंदा चांगलीच राहील. यामुळे ग्रामीण भागातील वाढीसह चालना मिळेल. देशासमोर सध्या मध्यम कालावधीची आव्हाने असून नजीकच्या भविष्यात त्यावर मात देता येईल.

Story img Loader