रिझव्‍‌र्ह बँकेकडून नव्या धाटणीची पेमेंट बँक म्हणून मान्यता मिळविलेल्या भारतीय टपाल विभागाची बँक म्हणून नोंदणी वर्षअखेपर्यंत होऊन बँकिंग व्यवसायास जानेवारी २०१७ मध्ये सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
टपाल विभागाला बँक स्थापन करण्यास निती आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा असून यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब अपेक्षित आहे. त्यामुळे टपाल विभागाची बँक म्हणून डिसेंबर २०१५ पर्यंत नोंदणी होईल. प्रत्यक्षात बँक स्थापन होण्यास त्यानंतर दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
३०० कोटी रुपयांच्या प्राथमिक भांडवलासह टपाल विभागाची बँक म्हणून स्वतंत्र रचना असेल. टपाल विभागाला बँक परवान्यासाठी पेमेट बँक म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेची ऑगस्टमध्येच प्राथमिक मंजुरी मिळाली आहे.
बँकिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी टपाल विभाग विविध २५ अर्जदारांमध्ये सामील होता. मात्र त्या पैकी बंधन व आयडीएफसी यांच्या अर्जाना मान्यता मिळून त्यांचे बँकिंग कामकाज अनुक्रमे २३ ऑगस्ट व १ ऑक्टोबरपासून सुरूही झाले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पेमेंट बँक म्हणून दर्जा मिळविणाऱ्या बँकांना क्रेडिट कार्ड देण्यास मान्यता नाही. मात्र डेबिट/एटीएम कार्ड देता येतील. त्याचबरोबर त्यांना ठेवी स्वीकारण्यास परवानगी आहे. मात्र वैयक्तिक खातेदारांना किमान एक लाख रुपये ठेवण्याची अट आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने १० पेमेंट बँका व १० लघु वित्त बँकांना प्राथमिक मंजुरी दिली आहे.

Story img Loader