डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण मर्यादेपलिकडे जात असून सोमवारी तिला एकाच व्यवहारात ६२ ते ६३ असा मोठय़ा आपटीचा नवा तळ गवसला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवसाची अखेर अशा नव्या ६३.१३ नीचांकाद्वारे करताना १४८ पैसे अशी व्यवहारातील दशकाची सर्वात मोठी आपटीही भारतीय चलनाने नोंदविली. दिवसभरात चलन १.६५ टक्क्यांनी रोडावले. २२ मेपासून सातत्याने नोंदविले जाणारे रुपयाचे अवमूल्यन सोमवारी सकाळच्या परकी चलन व्यवहारातच ६२ च्या पुढच्या रसातळाला भिडले. हा क्रम दिवसभर राहिला. यापूर्वीही रुपयाने गेल्याच शुक्रवारच्या व्यवहारात ६२.०३ असा नीचांक नोंदविला होता. मात्र सप्ताहअखेर बंद होताना तो ६२ च्या आत, ६१.७१ वर स्थिरावला. सोमवारच्या सकाळीच रुपया ६२ च्याही खाली गेला. ही घसरण विस्तारताना दुपारी ६३ लाही जाऊन भिडली. दिवसअखेरही त्यात स्थिरता आलीच नाही. अखेर शुक्रवारच्या तुलनेत १४८ पैशांची अधिक घसरण झाली. सोमवारी रुपया बंद होताना ६३ च्या खाली ६३.१३ पर्यंत येऊन थांबला. दिवसभरात ६२.३० ते ६३.२२ असा खालचा प्रवास केल्यानंतर चलनाने एकाच व्यवहारात १.६५ टक्क्यांची घसरण राखली. दिवसअखेर कालच्या तुलनेत १४८ पैशांची घट नोंदविणाऱ्या रुपयाची ही गेल्या दशकातील एकाच व्यवहारातील सर्वात मोठी आपटी ठरली. यापूर्वी २२ सप्टेंबर २०११ रोजी रुपयाने एकाच दिवसात १२४ पैशांची मोठी घट नोंदविली होती.
रोख्यांवरील व्याजाचा भार वाढला
भक्कम होत चाललेल्या अमेरिक चलनामुळे रोख्यांवरील व्याज पाच वर्षांच्या उच्चांकाला पोहोचले आहेत. १० वर्षे मुदतीच्या रोख्यांवर आता द्यावे लागणारे व्याज हे लेहमन ब्रदर्सच्या रुपातील आलेल्या जागतिक मंदीच्या पूर्वीच्या टप्प्यावर गेले आहेत. रोख्यांवर आता द्यावे लागणारे व्याज हे ९.१७ टक्क्यांपर्यंत गेले आहे. ते २१ ऑगस्ट २००८ नंतरचे सर्वाधिक व्याज आहे.
पतधोरण अधिक कडक केल्यानंतर रोख्यांवरील व्याजदराचे प्रमाणही विस्तारते, असे व्यापाऱ्यांना वाटते. २०१० ते २०११ दरम्यानदेखील अशीच स्थिती होती, अशी आठवण त्यांनी यानिमित्ताने करून दिली. त्यांच्या मते, ९ टक्क्यांच्या वर व्याज असणे हे धोक्याचे लक्षण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा