अमेरिकेतील बेरोजगारीची आकडेवारी अपेक्षेपेक्षाही अधिक सकारात्मक राहिल्याने येथील भांडवली बाजारातून संस्थागत गुंतवणूकदारांकडून विदेशी निधी काढून घेण्यासह आयातदारांकडून वाढत्या डॉलरच्या मागणीने रुपया दिवसभरात ६१.२१ पर्यंत घसरला. रुपयाचा हा सार्वकालिक नीचांक असून या अगोदर २६ जून रोजी त्याने प्रथमच प्रति डॉलर साठीपल्याड मजल मारत ६०.७२ नीचांक दाखविला आहे.
नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाच आंतरबँक चलन व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने ‘एकष्ठी’ साजरी करत आधीच डगमगलेल्या स्थानिक चलनाचा नवीन घसरण स्तर नोंदविला. दिवसअखेर रुपया ६०.६१ वर सावरला असला तरी व्यवहारात ६१.२१ असा सार्वकालिक नीचांक तळ आणि शुक्रवारच्या तुलनेत ३९ पैशांचे नुकसान त्याने दाखवलेच.
सोमवारी सत्राची सुरुवात करतानाच रुपया ६१ च्या वेशीवर पोहचला. ६०.९५ च्या स्तरावर व्यवहार सुरू केल्यानंतर रुपया तासाभरातच ६१.२१ पर्यंत खोलवर गेला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्ह टप्प्याटप्प्याने आर्थिक उभारीचा कार्यक्रमात आटोपते घेण्याची पूर्वपिठीका म्हणजे तेथील बेरोजगारीचा दर सुधारल्याची चिन्हे ताज्या आकडेवारीने स्पष्ट केली. परिणामी माघारी चाललेल्या विदेशी गुंतवणूकदारांकडून डॉलरला मागणी वाढली.
तथापि रिझव्‍‌र्ह बँकेने अपेक्षित हस्तक्षेप केल्याने रुपया त्याच्या विक्रमी तळापासून दिवसअखेर सावरला. दिवसभरात ६०.५८ पर्यंत उंचावलेला दिवसअखेर ३९ पैशांचे नुकसान सोसता झाला. शुक्रवारच्या ६०.२२ दरम्यानच्या नुकसानानंतर रुपयाने आज सलग दुसऱ्यांदा नकारात्मक प्रवास केला.
भारती एअरटेलने १०% कर्ज फेडले
नवी दिल्ली : आघाडीच्या दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या कर्जावरील डोईभार १० टक्क्यांनी कमी केला आहे. कतार फाऊंडेशन एन्डोवमेन्टमधील हिस्सा विक्रीच्या माध्यमातून आलेल्या रकमेतून कंपनीने ६,७९६ कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे.
कंपनीने या फाऊंडेशनमधील ५ टक्के हिस्सा गेल्या महिन्यात विकला होता. प्रति समभाग ३४० रुपयाने हा व्यवहार झाला होता. यासाठी १९,९८,७०,००६ नव्याने समभाग सादर करण्यात आले होते. भारती एअरटेलच्या मार्च २०१३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांतील कर्जाची रक्कम ६३,८३९ कोटी रुपये आहे.
युनियन बँकेची व्याजदर कपात
मुंबई : दोन राष्ट्रीय बँकांपाठोपाठ युनियन बँक ऑफ इंडियानेही आधार दरात कपात केली आहे. बँकेचा नवा दर पाव टक्क्याने कमी होत तो आता १० टक्के झाला आहे. नव्या दराची अंमलबजावणी तातडीने होत असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. याचबरोबर बँकेने तिच्या वाहन कर्जावरील व्याजदरदेखील कमी करत ते वार्षिक १०.४५ टक्क्यांवर आणून ठेवले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री आणि रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर यांनी व्याजदर कपातीबाबत केलेल्या आवाहनानंतर बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेने त्यांचे व्याजदर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यांचे सुधारित दर सोमवारपासूनच लागू झाले.

आगामी प्रवासाबाबत मतमतांतरे..
प्रमुख जागतिक चलनाबरोबरची डॉलरची पातळी गेल्या तीन वर्षांच्या उच्चांकावर असल्याने रुपयातील नरमाई अनुभवली जात असल्याचे मत ‘इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायजर्स’चे अभिषेक गोएंका यांनी नोंदविले आहे. तर येत्या काही दिवसांत रुपया ६२ पर्यंत घसरेल, असे ‘अल्पारी फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस’चे प्रमित ब्रह्मभट्ट यांनी म्हटले आहे. ‘सीआयआय’ या उद्योग संघटनेनेही सप्टेंबपर्यंत रुपयाचा प्रवास ५९ च्या खालीच असेल, असे भाकीत केले आहे. संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात सहभागी ५६ टक्के उद्योजकांनी, चालू खात्यातील वाढती तूट आणि या ना त्या कारणाने रखडलेली थेट विदेशी गुंतवणूक यामुळे चालू तिमाहीतही रुपयाचा प्रवास ५९ च्या खालचाच असेल, असे मत नोंदविले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ५८ ते ५९ असेल, अशी आशा  केवळ १५ टक्के सर्वेक्षण सहभागींनी व्यक्त केली आहे.

Story img Loader