मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम असून बुधवारी रुपया प्रथमच ८० रुपयांखाली स्थिरावला. स्थानिक चलन एकाच व्यवहारात तब्बल १३ पैशांनी आपटले. परिणामी परकीय चलन विनिमय मंचावर ते सत्रअखेर ८०.०५ या नीचांकी पातळीवर स्थिरावले. रुपयाचा हा ऐतिहासिक तळ ठरला. रुपयाने ७९.९१ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. त्यांनतर दिवसभरातील सत्रात ७९.८९ ही दिवसभातील उच्चांकी पातळी गाठली आणि अखेर ८०.०५ हा तळ गाठत तो त्याच पातळीवर विसावला.

रुपयाच्या सार्वकालिक नीचांकपदाला पोहचण्याची मालिका गेले काही दिवस निरंतर सुरू आहे. चलन बाजारातील व्यवहार सत्रात सोमवार आणि मंगळवारी सलगपणे रुपयाच्या विनिमय मूल्याने डॉलरच्या तुलनेत ८० ची वेस ओलांडली, पण दिवसाचे व्यवहार संपण्यापूर्वी मूल्य काहीसे सावरत होते. मंगळवारी भांडवली बाजारातील तेजीपूरक परकीय चलनाचा ओघ आणि मध्यवर्ती बँकेच्या हस्तक्षेपामुळे रुपया सहा पैशांनी सावरत ७९.९२ वर बंद झाला होता.

युरो, ब्रिटिश पाऊंड आणि जपानी येन यांसारख्या प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन कमी आहे. केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँक रुपयातील घसरण थोपवण्यासाठी उपाययोजना करत असून, रिझव्‍‌र्ह बँकेने परकीय निधीचा ओघ वाढवण्यासाठी विदेशी वाणिज्य कर्जमर्यादा शिथिल केली आहे. सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कमी होईल.  – डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार

Story img Loader