भांडवली बाजारात ‘सेन्सेक्स’च्या कालच्या ४०० अंशांच्या उसळीत शुक्रवारी आणखी २०६ अंशांची भर इतकेच नव्हे तर, गेल्या काही दिवसातील पडझडीने दुर्मिळ ठरलेली सप्ताहागणिक सकारात्मक वाढही दिसून आली. दुसरीकडे गेले सलग सहा दिवस रोज नव्या विक्रमी खोलात जाणाऱ्या रुपया आज केवळ उंचावलाच नाही तर त्याने दशकभरातील एक दिवसात घेतली नसेल इतकी म्हणजे १३५ पैशांची प्रति डॉलर उभारी घेतली. गेल्या काही दिवसात कमालीच्या खालावलेल्या बाजारभावनांनी अकस्मात सकारात्मक कलाटणी घ्यावी असेच चित्र दोन्ही बाजारात दिसले.
सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २०६.५० अंश वाढीसह सेन्सेक्स १८,५१९.४४ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६३.३० अंश वधारणेसह ५,४७१.७५ पर्यंत गेला. गेल्या सहा सत्रातील रुपयातील घसरण शुक्रवारी रोखली गेल्यानेही बाजारात उत्साह कायम राहिला.
सेन्सेक्सने गुरुवारीदेखील ४०८ अंशांची वाढ नोंदविली होती. सलग उसळीमुळे सेन्सेक्स त्याच्या १६ ऑगस्ट रोजीच्या १८,५९८.१८ च्या नजीक पोहोचला आहे. बाजारात आज बँक, वाहन तसेच तेल व वायू क्षेत्रातील कंपन्यांना मागणी राहिली. डॉलरच्या तुलनेत रुपया त्याच्या ६५ च्या नीचांकापासून मागे फिरल्याचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले.
नवे वायू साठे सापडल्याच्या वृत्ताने रिलायन्सचा समभाग १.६४ टक्क्यांपर्यंत उंचावला. शिवाय भेल, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी, कोल इंडिया,जिंदाल स्टील, टाटा स्टील, मारुती, महिंद्र असे साऱ्याच कंपन्यांचे समभाग मूल्य वधारले.
रुपया अखेर उंचावला
गेल्या सलग सहाही सत्रात घसरणीसह ऐतिहासिक नीचांकाचा क्रम राखणारे भारतीय चलन शुक्रवारी स्थिरावले. डॉलरच्या तुलनेत रुपया १३५ पैशांनी म्हणजे दशकातील सर्वात मोठय़ा उसळीसह उंचावला. दिवसाच्या मध्याला ६५.५६पर्यंत म्हणजे पुन्हा  सार्वकालीन नीचांकापर्यंत घसरलेला रुपया दिवसअखेर मात्र ६३.२० वर स्थिरावला
गेल्या १४ ऑगस्टपासून रुपयाने सलग सहा सत्रात तब्बल ३३६ पैशांची घसरण दाखवीत कालच्या गुरुवापर्यंत ६१.४३ ते ६४.५५ असा अवनत प्रवास ठेवला होता, त्याला आज विराम मिळाला. सर्वाधिक नीचांक स्तरापासून रुपया आता २३६ पैशांनी उंचावला आहे. सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी डॉलर बदल्यात १४८ पैशांची आपटी घेत चलनाने दशकातील सर्वात मोठी घसरण नोंदविली होती, तर आज सप्ताहअखेर मात्र त्याने १३५ पैसे अशा दशकातील उच्चांकी झेप घेत केली.  दिवसअखेर रुपयाची कमाई ही १० दिवसांच्या फरकाने दिसून आली आहे.
रुपया-सेन्सेक्स सकारात्मकतेची  कारणे काय?
आयात रोखणे आणि निर्यातीला चालना देणे या सरकारच्या प्रयत्नांना यश येण्याचे भाकीत व्यक्त करत ‘बार्कलेज’ या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने यामुळे चालू खात्यातील तुटीचे प्रमाण कमी होण्यासह डॉलरच्या तुलनेत रुपयादेखील ६१ पर्यंत स्थिरावेल, असा आशावाद व्यक्त केला. तर ‘क्रिसिल’नेही रुपयाबद्दलचा नकारार्थी दृष्टीक्षेप बदलून तो आर्थिक वर्षांअखेर ६०च्या पातळीवर स्थिरावेल, अशी सकारात्मकता दर्शविली.
यापूर्वी देशाची चालू खात्यातील तूट २०१३-१४ या वर्षांत ८० अब्ज डॉलर असेल, असे अंदाजणाऱ्या ‘बार्कलेज’ने आता ही तूट ६८ अब्ज डॉलपर्यंत सावरेल, असेही ताजा अहवलात म्हटले आहे. अर्थव्यवस्थेला हव्याशा आश्चर्यकारक उपाययोजना राबविण्याची संधी सरकारला असून विदेशी गुंतवणुकीचा ओघ कमी झाला, तरी सध्याची निर्यात प्रोत्साहक पावले तूट भरून काढण्यास उपयोगी ठरतील, असेही तिने नमूद केले आहे. अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी ही तूट ७० अब्ज डॉलपर्यंत राखण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. आयातीवरील खर्च कमी करण्याची गरज प्रतिपादन करत बार्कलेजने सोने व बिगर तेल वस्तूंची आयात तूट विस्तारू शकते, असे म्हटले आहे. ती कमी करण्यासाठी सेवा क्षेत्राची निर्यात वाढविण्याची गरज तिने निष्कर्षांत मांडली आहे.
‘क्रिसिल’नेही आपल्या अहवालात चालू खात्यातील तूटीबाबत पूर्वीचा कयास बदलून तो स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ४.२ टक्क्यांवरून ३.९ टक्क्यांवर आणला आहे. सोन्याच्या आयातीत दिसून येत असलेली २८-३० टक्क्यांची घट, तसेच बिगर-तेल आयातीतील लक्षणीय उतार पाहता हे अंदाजण्यात आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने अर्थव्यवस्थेतील रोकड-सुलभतेवर खेचलेला लगाम सैल करण्याचाही भांडवली बाजारावर सकारात्मक परिणाम दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा