नव्या संवत्सरासाठीची उत्सुकता भांडवली बाजाराने सप्ताहारंभीच दाखवून दिली. एकाच व्यवहारात सेन्सेक्सला तब्बल ३२१ अंशांची झेप घ्यायला लावत अर्थसुधारणेच्या वाटचालीचा मार्ग सुकर करून ठेवला. एक टक्क्य़ांहून अधिक अंश तेजीचा फटाका लावत मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू केली. तर निफ्टीनेही जवळपास शतकी वाढ राखत दिपोत्सवात सहभाग नोंदविला.
सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचा प्रवास सेन्सेक्सने २६,४३४.१६ अशा तेजीने सुरू केला. दुपारपूर्वीच तो २६,५०० च्या पुढे २६,५१७.९० या दिवसाच्या उच्चांकापर्यंत पोहोचला. तर सत्र  संपुष्टीपूर्वी त्याने २६,५०० च्या खाली, २६,३६८.९४ या सत्रातील तळही अनुभवला. अखेर शुक्रवारच्या तुलनेत तो २६,४२९.८५ वर थांबला. त्याची झेप ३२१.३२ अंशांची राहिली. २६,५१७.९० ते २६,३६८.९४ या दरम्यान मुंबई शेअर बाजाराच प्रवास राहिला.
३२१ अंशांची वाढ एकाच दिवसात नोंदवित सेन्सेक्सने सप्ताहातील सर्वोच्च झेपही नोंदविली. ९ ऑक्टोबर रोजीच्या ३९०.५० अंश वाढीनंतर सेन्सेक्सची सोमवारची सर्वोत्तम झेप राहिली. गेल्या शुक्रवारी मुंबई निर्देशांक १०९.१९ अंशांनी उंचावला होता. गेल्या आठवडय़ात जागतिक भांडवली बाजारातील घसरणीपायी २६ हजारांखाली रोडावलेला सेन्सेक्स शुक्रवारी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालाच्या आशावादावर उंचावला होता. राज्यात भाजपाला बहुमत मिळण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीचा जोर लावत मुंबई निर्देशांकात यावेळी शतकी भर घातली होती. अखेर रविवारी भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याचे निकाल जाहिर झाले आणि सोमवारी बाजारात तेजी नोंदविण्यास निमित्त मिळाले.
इंधन क्षेत्रातील सुधारणांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून उचलले गेलेल्या थेट पावलांचा अपेक्षित परिणाम बाजारावर दिसून आला. त्याचबरोबर भाजपाला महाराष्ट्रात मिळालेल्या मताधिक्यानेही आर्थिक राजधानी असलेल्या राज्यात यापुढे प्रगतीचे वारे वाहतील, अशी ग्वाही गुंतवणूकदारांच्या व्यवहारातून दिली गेली.
वाहन, भांडवली वस्तू, बँक, तेल व वायू, ऊर्जा असे सारे क्षेत्रीय निर्देशांक तेजीत राहिले. सर्व १२ पैकी १० निर्देशांकांनी वाढ नोंदविली. केवळ माहिती तंत्रज्ञानाशी निगडित समभागांना तेजीत भाग घेता आला नाही. ते दोघेही नकारात्मक, घसरणीच्या यादीत राहिले. डॉलरच्या तुलनेत सावरलेल्या रुपयाचा हा परिणाम असावा. गेल्या आठवडय़ात ६२ पर्यंत घसरणारा रुपया सप्ताहारंभीच सावरलेला पाहून आयटी कंपन्यांना महसुली उत्पन्नाबाबतची साशंकता निर्माण झाली. सेन्सेक्समधील २५ समभाग वधारले.
इंधनाचे दर बाजाराशी निगडित ठेवण्याच्या सरकारच्या उपाययोजनेमुळे सार्वजनिक तेल विपणन कंपन्यांचे समभाग व्यवहारात ८ टक्क्य़ांपर्यंत वधारले. सेन्सेक्समध्येही ओएनजीसी, गेल हे वरच्या स्तरावर होते. इंधनामुळे वाहन कंपन्यांचे समभागही वधारले. टाटा मोटर्स, मारुती, हीरो मोटोकॉर्पचे समभाग मूल्य ४ टक्क्य़ांपर्यंत उंचावले. त्याचबरोबर वाहन क्षेत्राशी निगडित अन्य कंपन्यांचेही मूल्य वधारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा