देशातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प नव्या पालघर जिल्ह्य़ातील शहापूर येथे येऊ घातला असून भारतातील सॅरस सोलर इंक कंपनीच्या माध्यमातून अमेरिकी कंपनीचा देशात तब्बल चार वर्षांनंतर पुनप्र्रवेश होत आहे. १,६०० एकर जागेवरील या प्रकल्पात ५०० मेगाव्ॉट सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य राखण्यात आले आहे.
भविष्यात येथे सौर पट्टय़ांची निर्मिती तसेच तांत्रिक प्रशिक्षण संस्थाही साकारण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाची अंतिम मान्यता प्रलंबित असून त्यानंतर येत्या अडीच वर्षांत प्रत्यक्ष वीज निर्मितीस सुरुवात होईल, अशी माहिती सॅरस सोलर इंकच्या संचालकांनी शुक्रवारी येथे दिली.
जगातील आघाडीची व विविध ४१ देशांमध्ये अस्तित्व असणाऱ्या कॅनेडियन सोलर कंपनीने चार वर्षांपूर्वी या क्षेत्रात रस दाखविला होता; मात्र प्रत्यक्षात तसे घडू शकले नाही. अमेरिकेतीलच मॅकी रिसर्च कॅपिटलच्या सुमारे ६,५०० कोटी रुपयांच्या आर्थिक पाठबळावर पुन्हा एकदा प्रयत्न झाला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील या प्रकल्पासाठी गायकेन लिमिटेडही तांत्रिक सहकार्य करणार आहे. त्याचबरोबर भारतातील जेएसके ग्रुप, नीलकांत सोलर एनर्जी व ग्रीनझोन फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने सॅरस सोलर इंक ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
राज्याच्या परवानगीची प्रतीक्षा
सॅरस सोलर इंकचे भारतातील प्रमुख अरुण अगरवाल यांनी सांगितले की, राज्य शासनाची याबाबतची अंतिम परवानगी मिळाल्यानंतर राज्याला सौर ऊर्जा पुरवण्याच्या देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळेल. हा प्रकल्प विविध टप्प्यांमध्ये साकारला जाणार असून भिवंडी परिसरातील औद्योगिक क्षेत्र तसेच ठाणे व पालघर जिल्ह्य़ातील कृषी क्षेत्राला सौर ऊर्जा प्रदान करता येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राबरोबरच गुजरात, ओडिशा व झारखंड राज्यांमध्येही याच कंपनीच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जा वितरित करण्याचे कंपनीचे उद्दिष्टही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा