अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे कारण बनलेल्या चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण मिळविण्यात सरलेल्या आर्थिक वर्षांत यश आले आहे. नव्याने आलेल्या नरेंद्र मोदी सरकारसाठी हे शुभसूचक ठरेल. सोने आयातीवरील र्निबधामुळे २०१३-२०१४ या आर्थिक वर्षांत चालू खात्यावरील तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत १.७ टक्के राहिली आहे. अमेरिकी डॉलरमध्ये हे प्रमाण ३२.४ अब्ज इतके आहे.
रिझव्र्ह बँकेने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दृश्य मिळकतीतील वाढीसह व्यापार तुटीतही घट झाली आहे. आधीच्या, २०१२-२०१३ मध्ये देशाची चालू खात्यावरील तूट ८७.८ अब्ज डॉलर म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तब्बल ४.७ टक्के होती.
परकी चलनाच्या रूपातील देशात येणारा व बाहेर जाणारा निधी म्हणून ओळख असलेल्या चालू खात्यावरील तूट जानेवारी ते मार्च २०१४ या तिमाहीत १.२ अब्ज, सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ०.२ टक्के राहिली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३.६ टक्के, १८.१ अब्ज डॉलर होती.
तुटीवर परिणाम करणाऱ्या रुपयाच्या ऐतिहासिक तळाने गेले आर्थिक वर्ष गाजले होते. ऑगस्ट २०१३ मध्ये डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ६८.८५ पर्यंत रोडावले होते. चालू खात्यावरील भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवरील शुल्क वाढीसह रिझव्र्ह बँकेनेही मौल्यवान धातूच्या आयातीवर र्निबध लादले होते.
परिणामस्वरूप, गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत सोन्याची आयात दोनतृतीयांशाने कमी होत ५.३ अब्ज डॉलर झाली होती. २०१२-२०१३ च्या जानेवारी ते मार्च दरम्यान ती तब्बल १५.८ अब्ज डॉलर होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा