देशाच्या चालू खात्यावरील भयंकर तुटीकडे पाहता, आपल्या अर्थव्यवस्थेची मुख्यत: डोकेदुखी बनलेली मौल्यवान धातू सोन्याची आयात सध्या काहीशी संथ झाली असली तरी, ऑक्टोबर ते डिसेंबर या सणोत्सवाच्या तिमाहीत ती पुन्हा उंचावलेली दिसेल, असा सराफ उद्योगाचाच कयास आहे.
सरकारने सोने आयात महाग करणारे १० टक्क्य़ांपर्यंत आयात शुल्क वाढविले असले तरी, चालू तिमाहीत डिसेंबपर्यंत १५० टन सोन्याची आयात होईल आणि संपूर्ण २०१४ आर्थिक वर्षांत आयातीचा आकडा ७२५ टनांवर जाईल, असे ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष हरेश सोनी यांनी सांगितले. सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बॉम्बे बुलियन असोसिएशनच्या वतीने आयोजित पहिल्या-वहिल्या शिखर परिषदेनिमित्त आले असताना सोनी यांनी हा कयास व्यक्त केला. २०१३-१४ च्या एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत भारताकडून ३५४ टन सोने आयात झाले आहे, परंतु देशातील २० टक्के सोने आयात ही निर्यातलक्ष्यी असेल अशा धर्तीच्या जुलैमधील रिझव्‍‌र्ह बँकेच्या र्निबधांनतरही, उर्वरित सहा महिन्यांत सोन्याची आयात पहिल्या सहामाहीपेक्षा जास्त राहणे त्यांना अपेक्षित आहे.
आभूषण निर्यातीला प्राधान्य द्या: नरेंद्र मोदी
‘बीबीए’च्या शिखर परिषदेचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले आणि परिषदेला उपस्थित सराफांना संबोधित करताना, त्यांनी सरकारच्या सद्य सोन्याविषयक धोरणाचा आढावा घेताना, सुवर्ण आभूषणांच्या निर्यातीवर अधिकाधिक भर देण्याचे आवाहन केले. घराघरांत दडलेले आणि देवस्थानांच्या मालकीचा सुवर्णसाठा खुला व्हायचा झाल्यास, प्रस्तावित राष्ट्रीय स्वर्ण निवेश योजना लवकरात लवकर आणली जाण्याचे त्यांनी आवाहन केले. जगाच्या दृष्टीने भारत हा सराफ उद्योगातील अग्रेसर देश असून, परिषदेला उपस्थित जागतिक सुवर्ण खाण उद्योगाचे प्रतिनिधी, प्रमुख सोने विनिमय बाजारपेठांचे प्रतिनिधी, विदेशी बँकांचे प्रमुख आणि सोनेविषयक विश्लेषकांची मोठय़ा संख्येने हजेरी दर्शविते, असे बॉम्बे बुलियन असोसिएशनचे मोहित कम्बोज यांनी सांगितले.

Story img Loader