दसरा-दिवाळीसारख्या सणानिमित्ताने वाढलेल्या सोने खरेदीमुळे मौल्यवान धातूची आयात पुन्हा मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. सप्टेंबरच्या ०.८ अब्ज डॉलरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये सोने-चांदीची आयात वधारून १.३ अब्ज डॉलर झाली आहे. अवघ्या महिन्याभरातील ही वाढ सुमारे ६२.५ टक्क्यांची आहे. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये सोने-चांदी आयात १.३ अब्ज डॉलर झाली असून, ती वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या ६.८ अब्ज डॉलरच्या तुलनेत कितीतरी कमी आहे. मात्र आधीच्या, सप्टेंबर महिन्याच्या ०.८ अब्ज डॉलरपेक्षा ती अधिक आहे. सप्टेंबरमध्ये ती उल्लेखनीयरीत्या घसरली होती. या दरम्यान सोन्याची आयात ८० टक्क्यांनी कमी झाली होती.
ऑक्टोबरपासून सण-समारंभाचा मोसम सुरू होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर सोने-चांदीच्या आयातीत वाढ झाली आहे. वाढती तूट सावरण्यासाठी केंद्र सरकार तसेच रिझव्र्ह बँक यांनी यापूर्वी वेळोवेळी मौल्यवान धातूच्या वापरावर र्निबध घातले आहेत. सोन्यावरील आयात शुल्कदेखील वर्षभरात तिसऱ्यांदा वाढविताना ते १० टक्क्यांवर नेऊन ठेवले.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यांत मात्र मौल्यवान धातूची आयात १२.८६ टक्क्यांनी कमी झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान ती २४ अब्ज डॉलर राहिली आहे. वर्षभरापूर्वी याच दरम्यान २८ अब्ज डॉलर होती. गेल्या आर्थिक वर्षांत सोन्याचे आयात ८४५ टन झाली आहे. वाढत्या मौल्यवान धातूंच्या आयातीमुळे २०१२-१३ मध्ये चालू खात्यातील तूटदेखील सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.८ टक्के अशी ऐतिहासिक पातळीवर पोहोचली.
निर्यात दोन वर्षांच्या उच्चांकी टप्प्यावर;
आयातीत आश्वासक घसरण
जागतिक अर्थव्यवस्था स्थिरावण्याचे लक्षण म्हणून यंदाच्या ऑक्टोबरमध्ये देशाची निर्यात गेल्या दोन वर्षांच्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचली आहे. निर्यातीने ऑक्टोबरमध्ये १३.४७ टक्के अशी भरघोस वाढ नोंदवितानाच ती २७.२७ अब्ज डॉलर झाली आहे. तुलनेने ऑक्टोबरमध्येच आयातदेखील १४.५ टक्क्यांनी रोडावत ३७.८ अब्ज डॉलर झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान आयात ३.८ टक्क्यांनी कमी, तर निर्यात मात्र ६.३२ टक्क्यांनी अधिक झाली आहे. आयात-निर्यातीतील सुधारस्थितीमुळे देशाची व्यापार तूट निम्म्यावर आली आहे. वार्षिक तुलनेत निम्म्यावर आलेली ऑक्टोबरमधील व्यापार तूट सप्टेंबर २०१३ च्या तुलनेत मात्र ६.७६ अब्ज डॉलरपेक्षा अधिक नोंदली गेली आहे.
सोन्याची वाढती आयात रोखण्यासाठी रिझव्र्ह बँकेने ८०:२० योजना लागू केली, मात्र त्याबाबत अधिक सुस्पष्टता नसल्यानेच ताज्या कालावधीत मौल्यवान धातूची आयात उंचावली.
एस. आर. राव, केंद्रीय वाणिज्य सचिव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा