अखेर देशाच्या निर्मिती क्षेत्राने उभारीचे संकेत दिले आहेत. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या निर्मिती क्षेत्राने सरलेल्या डिसेंबर महिन्यात वेग धरला इतकेच नव्हे तर दोन वर्षांतील उच्चांकी उत्पादन नोंदविल्याचे आकडे ताज्या सर्वेक्षणातून शुक्रवारी पुढे आले.
एचएसबीसी बँकेच्या ‘पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय)’ हा मासिक तत्त्वावर पाहणी करून काढला जाणारा निर्देशांक डिसेंबरमध्ये ५४.५ अंशांवर गेला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात तो ५०.३ अंशावर, तर नोव्हेंबर २०१४ या आधीच्या महिन्यात ५३.३ अंशावर होता. उल्लेखनीय म्हणजे पीएमआय निर्देशांकात ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्राची बहारदार कामगिरी राहिली असून, ती ग्राहकांमध्ये खरेदीवर खर्च करण्याची मानसिकता आणि पर्यायाने बाजारात उत्पादित वस्तूंची मागणी पूर्वपदावर येत असल्याचे संकेत देते. डिसेंबरमध्ये निर्यात क्षेत्राने एप्रिल २०११ नंतरची सर्वोत्तम कामगिरी दाखविली आहे.
केंद्राच्या सांख्यिकी विभागाकडून जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) तुलनेत एचएसबीसी पीएमआय निर्देशांकाने संपूर्ण वेगळे चित्र सामोरे आणले आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा वाढीचा दर ४.२ टक्के होता, जो ऑक्टोबर २०१३मधील ७.६ टक्के दराच्या तुलनेत कमालीचा घसरला होता. दोन महिन्यांत इतका लक्षणीय बदल आश्चर्यकारक असला तरी दिलासादायी निश्चितच आहे.
एचएसबीसी पीएमआय निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीने डिसेंबर महिन्यात नवीन ऑर्डर्समध्ये दमदार वाढीमुळे देशातील कारखानदारीने दोन वर्षांचा उच्चांकी वेग दाखविल्याचे दर्शविते. यातून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे सरकारकडून जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन (आयआयपी) निर्देशांकांबद्दलही निश्चितच आशादायी चित्र निर्माण झाले आहे. पीएमआय आणि आयआयपी निर्देशांकांच्या पाहणीसाठी घेतले जाणारे नमुने संख्यात्मक व गुणात्मकदृष्टय़ाही भिन्न आहेत. पण दोन्ही पाहण्यांचा एकूण कल सुधारणा दाखविणारा आहे, हे निश्चितच..
-प्रांजुल भंडारी, ‘एचएसबीसी’चे मुख्य अर्थतज्ज्ञ

Story img Loader